सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद रशियाच्या आश्रयाला, पण पुढे काय? वाचा देसाई यांची संपूर्ण मुलाखत

सीरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा पाडाव केला. सीरियामधल्या या उठावामुळे असद यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि रशियाचा आश्रय घ्यावा लागला. बशर अल असद पुन्हा सीरियामध्ये येऊ शकतील का ? अनेक वर्षे यादवीमुळे ग्रस्त असलेल्या सीरियाचं भवितव्य काय आहे ? याबद्दल वनइंडिया मराठीच्या पत्रकार आरती कुलकर्णी यांनी सीरीयाला जाऊन आलेले पत्रकार जतिन देसाई यांची मुलाखत घेतली. देसाई काय म्हणाले, ते आपण पाहू...

President Bashar Al Assad

देसाई यांनी केला सीरियाचा दौरा

जतिन देसाई यांनी 2014 मध्ये सीरियाचा दौरा केला होता. त्यावेळी सीरियामध्ये निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये बशर अल असद यांच्या निवडीची फक्त औपचारिकता बाकी होती, असं जतिन देसाई सांगतात. त्यानंतर काही वर्षांनी सीरियामध्ये झालेल्या निवडणुकाही असद यांच्या दहशतीखाली झाल्या होत्या. या निवडणुका म्हणजे पूर्णपणे फार्स होत्या. त्यात असद यांनाच 99 टक्के कौल मिळत राहिला. या निवडणुकांमधले गैरप्रकार, बंदुकांचा वापर असं सगळं पाहिलं तेव्हाच सीरियामध्ये पूर्ण अराजक माजेल, अशी चिन्हं दिसत होती, असंही जतिन देसाई यांनी सांगितलं. पण त्याही स्थितीत महिलांची स्थिती मात्र चांगली वाटली, असं त्यांचं निरीक्षण आहे. अफगाणिस्तान, इराण या देशांच्या तुलनेत इथे मात्र महिलांना त्यांचे अधिकार आहेत, स्वातंत्र्यही आहे, असं ते सांगतात.

तब्बल ५३ वर्षांची आहे पकड

असद यांच्या कुटुंबियांची सीरियावर तब्बल 53 वर्षाची पकड होती. असद कुटुंब ज्या अलवाइट समुदायातले आहेत तो समुदाय सीरियामधला एक वंचित समुदाय समजला जातो. सीरियामध्ये सुन्नी लोक जास्त आहेत. तरीही शिया पंथाचे आणि त्यातही अलवाईट समुदायाचे असलेल्या असद कुटुंबाने सीरियावर सत्ता गाजवली.

अरब राष्ट्रांत सुरु होते उठाव

2011 मध्ये अरब राष्ट्रांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधातले उठाव सुरू झाले. ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त या देशांमध्ये या चळवळींचं लोण पसरलं. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांची अनेक वर्षांची राजवट उलथवून टाकण्यात आली. लिबियामध्येही जोरदार उठाव झाले आणि लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांना ठार मारण्यात आलं. त्याचप्रमाणे आता सीरियामध्ये बंडखोरांनी उठाव करून बशर अल असाद यांची सत्ता उलथवून लावली आहे, असं जतिन देसाई यांनी सांगितलं.

पाच लाख लोकांनी केलं स्थलांतर

सीरियामधल्या यादवीमुळे पाच लाखांहून जास्त लोकांनी सीरियामधून स्थलांतर केलं आहे. अलेप्पो, दमास्कस यासारखी शहरं उद्धवस्त झाल्याने पूर्ण देशच युद्धभूमी झाला आहे. सीरियामधून ग्रीसमार्गे युरोपात स्थलांतर करण्याचं प्रमाण मोठं आहे. अशाच एका स्थलांतरामध्ये अयान कुर्दी या चिमुकल्याचा मृतदेह समुद्रकिनारी आढळला तेव्हा अवघं जग हादरलं होतं. अँब्युलन्समध्ये एका खुर्चीत जखमी अवस्थेत बसलेल्या एका लहानग्याचा फोटोही असाच अस्वस्थ करणारा होता. या छायाचित्रांमुळे सीरियाची व्यथा सगळ्यांसमोर आली पण युद्ध, यादवी, हिंसाचार सुरूच राहिला याची जतिन देसाई यांनी आठवण करून दिली.

जगावर होताहेत परिणाम

इराण, हिजबुल्लाह आणि रशियाकडून मदत कमी झाल्याने सीरियाची बंडखोरांशी लढण्याची ताकद कमी झाली आणि अखेर दमास्कसचा पाडाव झाला. एकीकडे इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्षाने तीव्र स्वरूप धारण केलं आहे. त्यातच इराण, लेबनाॅन, येमेन या देशांतही या संघर्षाचं आणि हवाई हल्ल्यांचं लोण पसरलं आहे. याचे परिणाम जगाचं राजकारण आणि अर्थकारणावरही होत आहेत, असं जतिन देसाई म्हणाले.

धर्मावरील राजकारणाचा होतो अंत

बशर अल असद यांचं आता नेमकं काय होणार? या अराजकातून सीरिया कसा सावरणार हे प्रश्नच आहेत. पण धर्माच्या आधारे केल्या जाणाऱ्या राजकारणाचा अंत असाच होतो हा सीरियाच्या उठावातून मिळालेला धडा आहे. बांगलादेश, पाकिस्तान या देशांतही अशाच पद्धतीने राजकारण चाललं आहे आणि त्याचा फटका व्यापार, अर्थकारणाला बसतो आहे, असं जतिन देसाई यांनी सांगितलं. या सगळ्या स्थितीत भारताला अत्यंत सावध मुत्सद्देगिरी करावी लागणार आहे. शेजारी देशांशी असलेले संबंधही राखायचे आणि चीनच्या आव्हानालाही तोंड द्यायचं यामध्ये भारताची कसोटी लागणार आहे, असं जतिन देसाई म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+