'ऑपरेशन सिंदूर'ने पाक हादरले;36 तासांत 80 ड्रोनचा मारा अन् 11 हवाई तळांचे नुकसान; पाक नेत्याची कबुली
Noor Khan Airbase destroyed : भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या दाहकतेची कबुली अखेर पाकिस्तानला द्यावी लागली आहे. "भारताने अवघ्या ३६ तासांत पाकिस्तानच्या हद्दीत किमान ८० ड्रोन उडवले," अशी धक्कादायक माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी दिली आहे. रावळपिंडी येथील महत्त्वाच्या 'नूर खान' एअरबेसवर भारतीय ड्रोनने यशस्वी मारा केल्याचे मान्य करत, पाकिस्तानने प्रथमच या कारवाईत झालेल्या नुकसानाची अधिकृत वाच्यता केली आहे.

इशाक दार यांची कबुली: काय घडले ३६ तासांत?
वर्षअखेरीस आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना इशाक दार यांनी भारतीय हल्ल्याची तीव्रता स्पष्ट केली. दार यांच्या म्हणण्यानुसार, भारताने अतिशय कमी वेळात मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करून पाकिस्तानी हवाई हद्दीचे उल्लंघन केले. त्यांनी सांगितले की, "सीमा ओलांडून आलेल्या ८० ड्रोनपैकी ७९ ड्रोन पाकिस्तानी सैन्याने पाडले, मात्र एका ड्रोनने थेट लष्करी तळावर धडक दिली." या हल्ल्यात नूर खान एअरबेसचे नुकसान झाले असून अनेक सैनिक जखमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा 'हिशोब' चुकता
भारतीय लष्कराने ७ मे रोजी पहाटे या मोहिमेला सुरुवात केली होती. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' आखले होते. या कारवाईत भारतीय सैन्याने केवळ दहशतवादी तळच नव्हे, तर त्यांना रसद पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांनाही लक्ष्य केले. पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानमधील एकूण नऊ दहशतवादी तळ या मोहिमेत उद्ध्वस्त करण्यात आले.
११ हवाई तळ निशाण्यावर: नूर खान ते सरगोधापर्यंत त्रेधातिरपिट
'ऑपरेशन सिंदूर' केवळ ड्रोन हल्ल्यापुरते मर्यादित नव्हते. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या एकूण ११ हवाई तळांना लक्ष्य केले होते. यामध्ये खालील महत्त्वाच्या तळांचा समावेश होता:
- नूर खान एअरबेस (रावळपिंडी)
- मुशफ एअरबेस (सरगोधा)
- रफीकी, जैकबाबाद (शाहबाज एअरबेस)
- मुरीदके आणि भोलारी
जरी पाकिस्तानने नंतर हे तळ दुरुस्त केल्याचा दावा केला असला, तरी उपग्रह छायाचित्रांनी (Satellite Images) या तळांच्या मोठ्या नुकसानाची पुष्टी केली आहे.
"पाकचा आकडा खोटा!" - निवृत्त ले. जनरल केजेएस ढिल्लन यांचा पलटवार
भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी इशाक दार यांच्या विधानातील फोलपणा उघड केला आहे. ढिल्लन यांच्या मते, पाकिस्तान 'किरकोळ नुकसान' झाल्याचे सांगून जगाची दिशाभूल करत आहे. त्यांनी 'समा टीव्ही'च्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानने त्यांच्या १३८ जणांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. जर नुकसान किरकोळ होते, तर इतक्या मोठ्या संख्येने मरणोत्तर पुरस्कार का दिले गेले? हा आकडाच पाकिस्तानच्या मोठ्या जीवितहानीची साक्ष देतो.
"पाकिस्तानी नागरिकांनी समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये नूर खान एअरबेसला लागलेली भीषण आग स्पष्ट दिसत होती. केवळ एक नव्हे, तर सर्व ११ तळांचे अपरिमित नुकसान झाले आहे." - ले. जनरल (नि.) केजेएस ढिल्लन
३० सेकंदांचा थरार: अण्वस्त्र हल्ल्याची भीती?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी या ऑपरेशनबाबत एक खळबळजनक खुलासा केला होता. त्यांच्या मते, जेव्हा भारताने क्षेपणास्त्रे डागली, तेव्हा ती 'अण्वस्त्रधारी' आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ ३० ते ४५ सेकंदांचा अवधी होता. यावरून भारतीय हल्ल्याचा वेग आणि अचूकता किती घातक होती, हे स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications