अमेरिकेशी तणाव, मोदींचा संयुक्त राष्ट्र महासभेत न जाण्याचा निर्णय: भारताची भूमिका कोण मांडणार?
PM Modi UN session 2025 : सध्या अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे आणि व्यापारी धोरणांमुळे दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यात कटुता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात उपस्थित न राहण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जागतिक राजनैतिक वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताकडून कोण जाणार!
यावेळी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची बाजू मांडण्याची जबाबदारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
२६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींचे भाषण निश्चित करण्यात आले होते, परंतु अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
अमेरिकेशी वाढलेला तणाव आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता, हा निर्णय अधिक धोरणात्मक असू शकतो, असा अंदाज राजनैतिक वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानसोबत व्यासपीठ सामायिक करणे टाळणार?
पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात. काही जाणकारांच्या मते, पाकिस्तानचे नेते देखील या व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्यामुळे मोदींनी पाकिस्तानसोबत व्यासपीठ सामायिक करणे टाळले असावे. जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी हा एक वेगळा डाव असू शकतो.
ट्रम्प यांचे पुनरागमन आणि व्यापारी वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेतील हे त्यांचे पहिलेच मोठे जागतिक व्यासपीठ असेल.
त्यांनी अलीकडेच भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली होती आणि अमेरिकेने भारत आणि रशियाला चीनकडून 'गमावले' आहे, असेही म्हटले होते. याव्यतिरिक्त, अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लादून व्यापारी संबंधांमध्येही कटुता आणली आहे. अशा परिस्थितीत, जयशंकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
८० वे अधिवेशन: 'एकत्र चांगले'
संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० वे अधिवेशन ९ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या वर्षीची थीम 'एकत्र चांगले: शांतता, विकास आणि मानवी हक्कांसाठी ८० वर्षे आणि त्याहून अधिक' अशी आहे.
२३ सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण होईल, त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी हवामान शिखर परिषद होईल. या सर्व पार्श्वभूमीवर, आता सर्वांच्या नजरा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणाकडे लागल्या आहेत. ते वॉशिंग्टनचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतील की भारताच्या 'स्वतंत्र परराष्ट्र धोरणा'चा नवीन संदेश जगाला देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications