पाकिस्तानसोबतच्या दुश्मनीतही भारताने दाखवली मानवता; अतारी बाँर्डरवर नेमके काय झाले? वाचा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उटलली. पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहिम सुरु करुन त्यांना त्यांच्या देशात जाण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यानंतर सीमा बंद करण्यात आली होती. मात्र आता अटारी सीमेवरुन पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा दिला आहे. यापूर्वी १ मे पासून सीमेवरील सर्व हालचाली आणि व्यापार पूर्णपणे स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

काय होते गृहमंत्रालयाचे आदेश?
केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वी अटारी सीमेवरील सर्व नागरी आणि व्यावसायिक क्रियाकलाप थांबवण्याचे आदेश दिले होते. ज्यामुळे प्रवासात अडकलेल्यांना विशेषतः वैध प्रवास कागदपत्रे असलेल्या पाकिस्तानी नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. परंतु आज भारत सरकारने मानवतेचे दर्शन घडवले. भारत सरकारने आता वैध कारणांमुळे घरी परतण्याची आवश्यकता असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी सीमा खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे.
नेमके काय झाले होते?
अटारी सीमेवर गुरुवारी सकाळी अनेक पाकिस्तानी नागरिक पोहोचले. गृहमंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशाची त्यांना माहिती नव्हती. सीमा सुरक्षा दलाने (BSF) सुरुवातीला या नागरिकांना अडवून धरले होते. त्यानंतर नव्या आदेशानंतर त्यांना भारताच्या सीमेबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. सुधारित आदेश लागू झाल्यामुळे सीमेवरील पाकिस्तानी नागरिकांनी दिलासा मिळाला. त्यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
आत्तापर्यंत किती नागरिक गेले?
२४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत कडक सुरक्षा व्यवस्था असताना दोन्ही देशांमधील सीमा ओलांडणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची संख्या लक्षणीय होती. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात एकूण ९२६ पाकिस्तानी नागरिक त्यांच्या मायदेशी परतले. १,८४१ भारतीय नागरिक भारतात परतले. २४ मे रोजी २८ पाकिस्तानी परत गेले व १०५ भारतीय पाकिस्तानातून भारतात आले. २५ मे रोजी १९१ पाकिस्तानी परत गेले व २८७ भारतीय परत आले. २६ मे रोजी ८१ पाकिस्तानी परत गेले व ३४२ भारतीय परत आले. २७ मे रोजी २३७ पाकिस्तानी परत गेले व ११६ भारतीय परत आले. २८ मे रोजी १४५ पाकिस्तानी परत गेले व १७५ भारतीय परत आले. २९ मे रोजी १०४ पाकिस्तानी परत गेले व ४९१ भारतीय परत आले. ३० मे रोजी १४० पाकिस्तानी परत गेले व २२५ भारतीय परत आले.
भारत-पाकिस्तान तणाव वाढला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अटारी लँड-ट्रान्झिट पोस्ट तात्काळ बंद करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व व्यापार व दळणवळण बंद केले होते. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी उपलब्ध असलेल्या १६ पैकी १४ व्हिसा श्रेणी रद्द केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय उर्वरित दोन व्हिसा प्रकारांपैकी एकाच्या स्थितीचा आढावा घेत असल्याचे वृत्त आहे. सध्या या दोन्ही देशांत तणाव असून कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications