व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार: डोनाल्ड ट्रम्प संतापले, म्हणाले "हा दहशतवादी हल्ला!"
Donald Trump News : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे थँक्सगिव्हिंग सुट्टीच्या पूर्वसंध्येला एक गंभीर घटना घडली आहे.
व्हाईट हाऊसपासून अगदी काही अंतरावर वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या हल्ल्याला "घृणास्पद हल्ला" आणि "दहशतवादी कृत्य" असे संबोधले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पेंटागॉनला अमेरिकेच्या राजधानीत 500 अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

ट्रम्प यांचा संताप आणि राष्ट्राविरुद्ध गुन्हा
घटनेच्या वेळी अध्यक्ष ट्रम्प फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये होते. त्यांनी एका व्हिडिओ भाषणाद्वारे राष्ट्राला संबोधित केले आणि या घटनेचा निषेध केला. "हा आपल्या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध आणि मानवतेविरुद्ध गुन्हा आहे," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
व्हाइट हाउस के बाहर गोलीबारी के बाद की डरावनी फुटेज। पुलिस और नेशनल गार्ड मौके पर पहुंचे।
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) November 26, 2025
pic.twitter.com/v1HVaydfY0
व्हाईट हाऊसपासून काही पावलांवर सेवा करणाऱ्या नॅशनल गार्ड सदस्यांवर झालेला हा भयानक हल्ला देशाच्या सुरक्षेसाठी एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ला झाल्यानंतर व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्स ताबडतोब बंद करण्यात आले आणि कायदा अंमलबजावणी संस्था परिसराची कसून चौकशी करत आहेत.
अफगाण नागरिकांची चेकिंग, बायडेनवर प्रत्युत्तर
या घटनेनंतर ट्रम्प यांनी थेट माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर टीका केली. न्याय विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला होता.
ट्रम्प यांनी मोठी घोषणा
पुन्हा तपासणी: माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानातून अमेरिकेत प्रवेश केलेल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची पुन्हा तपासणी केली जाईल. या घोषणेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या अफगाण नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण आता त्यांची कडक तपासणी केली जाईल. ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे बायडेन प्रशासनाच्या स्थलांतर धोरणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
संशयित ताब्यात
या गोळीबारात जखमी झाल्यानंतर २९ वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तो अफगाण नागरिक असून, २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता. न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गोळीबाराची "दहशतवादी कृत्य" म्हणून चौकशी केली जात आहे, ज्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
एकंदरीत, व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्ड्सवर झालेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर आणि स्थलांतर धोरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.












Click it and Unblock the Notifications