दलाई लामांच्या लडाख दौऱ्याने चीनला मिरची झोंबली; भारतला दिला थेट इशारा, म्हणाले- संबंधांत हा 'काटा'?
dalai lama ladakh china tension india relations : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यापूर्वी, दलाई लामा यांच्या लडाख दौऱ्याने चीनला जोरदार मिरची झोंबली आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकारीच्या मुद्द्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून, हा मुद्दा भारत-चीन संबंधांमध्ये 'काटा' असल्याचे म्हटले आहे. शनिवारी, कडक सुरक्षेत दलाई लामा लेह विमानतळावर पोहोचले, आणि त्यांच्या या दौऱ्याने चीनच्या भुवया उंचावल्या आहेत.
चीनचा भारताला कडक इशारा
बीजिंगमधील चिनी दूतावासाने रविवारी एक निवेदन जारी करत भारताला 'झिझांग' (तिबेट) शी संबंधित संवेदनशीलता गांभीर्याने समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनच्या मते, दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी आणि पुनर्जन्माचा विषय हा त्यांचा 'पूर्णपणे अंतर्गत मुद्दा' आहे आणि यात कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला स्थान नाही.
चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "'शिझांग'शी संबंधित मुद्दा भारत-चीन संबंधांमध्ये काट्यासारखा आहे आणि तो भारतासाठी एक ओझे बनत आहे. 'शिझांग कार्ड' खेळणे हे भारतासाठी आत्मघातकी पाऊल ठरेल."
यू जिंग यांनी भारतीय धोरणात्मक तज्ञ, माजी अधिकारी आणि शिक्षणतज्ञांनी दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत केलेल्या 'अयोग्य विधानांवर' देखील आक्षेप घेतला आहे.
ही विधाने भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणाशी जुळत नाहीत, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी तिबेटमधील तिबेटींनी त्यांची पारंपारिक संस्कृती, पोशाख, अन्न आणि वास्तुकला मुक्तपणे जपली असल्याचे सांगत काही छायाचित्रेही शेअर केली.

धार्मिक स्वातंत्र्याला समर्थन- भारताची भूमिका?
या प्रकरणावर भारत सरकारने आपली तटस्थ भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ४ जुलै रोजी माध्यमांना सांगितले की, "भारत सरकार धार्मिक श्रद्धा आणि परंपरांशी संबंधित बाबींवर कोणतीही अधिकृत भूमिका घेत नाही किंवा कोणतीही टिप्पणी करत नाही. भारताने नेहमीच सर्वांसाठी धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे."
केंद्रीय मंत्र्यांच्या विधानामुळे चीन संतप्त
चीनच्या तीव्र प्रतिक्रियेमागे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे विधान हे एक महत्त्वाचे कारण आहे. रिजिजू यांनी दलाई लामांच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थिती लावली होती आणि त्यावेळी ते म्हणाले होते की, बौद्ध अनुयायी म्हणून त्यांचा असा विश्वास आहे की, दलाई लामा आणि त्यांचे कार्यालयच उत्तराधिकारी ठरवण्याचे अधिकारी आहेत. चीनने यावर तीव्र आक्षेप घेत याला 'चीनविरोधी फुटीरतावादी वृत्ती' असे म्हणत त्यांनी पलटवार केला होता
दलाई लामांनी काय केले स्पष्टीकरण!
मिळालेल्या माहितीनुसार, याच महिन्यात त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या समारंभात, दलाई लामा यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांच्या उत्तराधिकारीची निवड पूर्णपणे धार्मिक प्रक्रियेद्वारे केली जाईल आणि त्यात चीनची कोणतीही भूमिका नसावी. या विधानामुळे चीन आणखी संतप्त झाला आहे, कारण चीनला उत्तराधिकारी त्यांच्या सरकारने मंजूर करावा असे सातत्याने वाटत आहे.
भारतात निर्वासित आणि राजनैतिक फायदा
१९५९ पासून दलाई लामा भारतात निर्वासित जीवन जगत आहेत, जेव्हा त्यांनी तिबेटमध्ये चिनी राजवटीविरुद्ध अयशस्वी बंड केले. भारतीय धोरणात्मक तज्ञांचा असा विश्वास आहे की दलाई लामा यांची भारतात उपस्थिती भारतासाठी राजनैतिक फायदा आहे.
सध्या भारतात सुमारे ७०,००० तिबेटी निर्वासित आहेत आणि धर्मशाळेतून काम करणारे निर्वासित तिबेटी सरकार देखील आहे. अर्थात दलाई लामांच्या या दौऱ्याने भारत आणि चीन यांच्यातील संवेदनशील मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हा 'काटा' जयशंकर यांच्या चीन दौऱ्यावर कसा परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications