SIM Card Scam : ई-सिम कार्ड घेताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, फसवणुकीचा नवा फंडा, नुकसान कस टाळायचं
SIM Card Scam : कोणतेही काम करायचे तर आपण ऑनलाईन करण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि कामही जलद होते, पण ही काम करताना सायबर भामटे तुमच्यावर टपून असतात. ते तुम्हाला या ना त्या गोष्टीत अडकवून गंडवू शकतात. अलीकडे ई-सीम कार्ड स्कॅम वाढत आहेत. या स्कॅममध्ये अनेकजण अडकले आहेत, त्यामुळे ऑनलाईन कामं करताना आपला नंबर लागू नये यासाठी हा लेख खास तुमच्यासाठी...
बँकेतून बोलतोय क्रेडीट कार्डची पतमर्यादा वाढवून देतो, विदेशातून पार्सल आले, त्यात ड्रग्ज आहे, तुम्हाला अटक होईल असे फंडे वापरत सायबर भामटे फसवणूक करत असतात. ट्रेंडनुसार ते काम करतात आपणही आता जागरुक राहण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ई-सिम कार्ड देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ई- सिम कार्ड देण्याच्या नावाखाली अनोळखी नंबरवरुन व्हॉटसअप केला जातो. त्यावरुन ई- सिम कार्ड वापरण्यासंदर्भात व्यक्तींना माहिती दिली जाते. ई- सिम सक्रीय करण्यासाठी एसएमसवरुन कोड पाठवतोय, असं सांगितलं जातं. ओटीपी मिळाला की संबंधित व्यक्तीला दोन तीन दिवसात ई-सिम सक्रीय केलं जाईल, असं सांगतात, याशिवाय प्रत्यक्ष सिम कार्ड दोन ते तीन दिवसात येईल, असं सांगितलं जातं. याद्वारे आपली सर्व माहिती जाणून घेत सायबर भामटे तोपर्यंत आपले खाते रिकामे करतात आपल्याला थांगपत्ता नंतर लागतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे प्रकार घडत असल्यास सावधान..
एका व्यक्तीच्या बाबतीत फसवणुकीचा असाच प्रकार घडल्याचं समोर आले आहे. ई सिमकार्डच्या नावाखाली व्हाट्सअपवरुन फोन करुन ओटीपी घेत त्या महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे या महिलेच्या नावाने 7.40 लाखांचं कार लोन काढण्यात आलं.
सिम ब्लॉक स्कॅम : या प्रकारात व्यक्तीला मेसेज येतो की त्यांचं सिम वेरिफिकेशन केलं नाही किंवा पैसे भरले नाही तर बंद होईल. त्यानंतर भामटे फसवी लिंक पाठवून गंडवतात.
सिम स्वॅप : सायबर गुन्हेगार फिशिंग अटॅकद्वारे डेटा चोरतात, नेटवर्क पुरवणाऱ्यांशी संपर्क साधतात. सिम कार्ड बदलून देण्याची मागणी करतात. नवं सिम सुरु झालं की बँकेचे ओटीपी त्यांना मिळतो आणि मूळ वापरकर्त्याचं सिम बंद झाल्याने सर्व ताबा सायबर भामट्यांकडे जातो.
सिम क्लोनिंग : अत्याधुनिक टूल्सचा वापर करुन सायबर गुन्हेगार डेटा कॉपी करुन डुप्लीकेट सिम तयार करतात आणि आर्थिक फसवणूक करतात.
केवायसी पडताळणीत फसवणूक : सायबर गु्न्हेगार टेलिकॉम कंपन्यांचा प्रतिनिधी बोलत असल्याचं सांगून एखाद्या व्यक्तीकडून आधार क्रमांक, पॅन क्रमांक, केवायसी डिटेल्स सिम ब्लॉक होण्यापासून रोखण्याच्या नावाखाली डेटा मिळवून ओटीपी मागवतात आणि फसवतात.
सिम कार्ड स्कॅम असे ओळखा?
- कोणताही इशारा न देता नेटवर्क गेल्यास स्कॅमर्सने त्या क्रमांकाचा कंट्रोल घेतल्याचं स्पष्ट होतं.
- तुम्ही विनंती न करता तुम्हाला ओटीपी क्रमांक अथवा व्यवहाराचे अलर्ट येणं.
- संशयास्पद फोन आणि मेसेज : केवायसी अपडेटस, आधार, पॅन आणि ओटीपी क्रमांक अनोळखी क्रमांकावरुन येणे.
- भामट्यांना आपली कोणतीही माहिती देणे टाळा.
- कुणालाही तुमचा ओटीपी शेअर करु नका.
काय बाळगाल सावधगिरी...
बँकिंग आणि ईमेलची सुरक्षा वाढवण्यासाठी एसएमएस बेस्ड ओटीपी वापरण्याऐवजी गुगल ऑथेन्टिकेटरचा वापर करावा.
आधार, पॅन, ओटीपी, बँकिंग संदर्भातील माहिती फोन क्रमांक, एसएमएस किंवा ईमेलवर शेअर करु नका.
टेलिकॉम प्रोवायडर्स सिम स्वॅप साठी पिन सेट करण्याची परवानगी देतात त्यामुळं अधिक सुरक्षा मिळते.
फसवणूक होत असल्यास येथे करा संपर्क
सिम स्वॅप विनंती नोटिफिकेशन आल्यास मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीला संपर्क करा. सिम बंद पडत असल्यास टेलिकॉम नेटवर्क प्रोव्हायडरला संपर्क करा. एखादी संशयास्पद हालचाल दिसून आल्यास 1930 या क्रमांकावर कॉल करा किंवा सायबर क्राईमच्या http:www.cybercrime.gov.in ला भेट द्या.












Click it and Unblock the Notifications