Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम
epfo pension claim rejection reasons and 20 day rule : देशातील करोडो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आर्थिक आधार म्हणजे भविष्य निर्वाह निधी (PF) आणि पेन्शन. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला पैशांसाठी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नियमानुसार, कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याचा पेन्शन किंवा पीएफ क्लेम जास्तीत जास्त २० दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे.

मात्र, अनेकदा असे दिसून येते की २० दिवस उलटूनही क्लेम सेटल होत नाही किंवा तो थेट रिजेक्ट (नाकारला) केला जातो. नुकत्याच संसदेत उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याची महत्त्वाची कारणे स्पष्ट केली आहेत.
का रखडतो पेन्शनचा क्लेम? 'ही' आहेत मुख्य कारणे
१. अपूर्ण किंवा चुकीची माहिती
EPFO च्या मते, क्लेम रिजेक्ट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अर्जामध्ये असलेली चुकीची माहिती. बँक खाते क्रमांक, सेवेचा रेकॉर्ड किंवा वैयक्तिक तपशील भरताना झालेल्या चुकांमुळे प्रक्रिया थांबते.
२. केवायसी (KYC) मधील तफावत
तुमच्या ईपीएफओ रेकॉर्डमधील नाव, जन्मतारीख किंवा आधार कार्डवरील माहिती यामध्ये तफावत असल्यास क्लेम रिजेक्ट होतो. नावाच्या स्पेलिंगमधील छोटीशी चूकही मोठी अडचण ठरू शकते.
३. बँक खात्याचा तपशील
अनेकदा कर्मचारी जुन्या किंवा बंद पडलेल्या बँक खात्याचा तपशील देतात. तसेच, बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास पेन्शन जमा होण्यास तांत्रिक अडचणी येतात.
४. नोकरीचा कालावधी (Service History)
पेन्शनसाठी किमान १० वर्षांची सलग सेवा असणे आवश्यक आहे. जर तुमच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये नोकरी सोडल्याची तारीख किंवा रुजू झाल्याची तारीख चुकीची असेल, तर सिस्टम क्लेम स्वीकारत नाही.
५. कौटुंबिक पेन्शनसाठी कागदपत्रांची कमतरता
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने क्लेम केल्यास मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र आणि नॉमिनेशन (नामांकन) फॉर्म अपडेट असणे आवश्यक आहे. यात त्रुटी असल्यास क्लेम फेटाळला जातो.
(महत्त्वाची टीप: तज्ज्ञांच्या मते, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपले 'UAN' पोर्टल तपासून त्यातील माहिती अपडेट ठेवली पाहिजे. विशेषतः आधार सीडिंग आणि नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण असल्यास निवृत्तीनंतर २० दिवसांच्या आत पैसे मिळणे सोपे होते.)












Click it and Unblock the Notifications