कुणी फ्रिजमध्ये मृतदेह ठेवला, तर कुणी पाच राज्यात खून केले... २०२४ मधील थरकाप उडविणाऱ्या घटना
नववर्षाच्या आगमनासाठी फक्त तीन दिवस राहिलेत. नवीन वर्ष २०२५ हे नव्या रुपात येणार आहे. मात्र सरत्या २०२४ मधील काही घटनांमधून आपल्याला काहीतरी शिकून पुढे जावे लागणार आहे. सरत्या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं, खूप काही दिलं, मात्र सरत्या वर्षात अशाही काही घटना घडल्या ज्याने भारतालाच काय पण जगालाही हादरवून सोडलं. सरत्या वर्षांतील अशाच थरकाप उडवणाऱ्या काही घटनांचा आपण लेखोजोखा पाहणार आहोत...

१. प्रेयसीची स्मशानात हत्या
जून महिन्यात यूपीत एका सायको किलरला पोलिसांनी जेरबंद केलं. या सायको किलरची कथा काहीशी वेगळीच होती. अदनान उर्फ बल्लू असं याचं नाव होतं. त्याचं एका विवाहित महिलेसोबत अफेअर होतं. मात्र त्या महिलेचं इतरांशी बोलणं त्याला आवडत नव्हतं. त्यातूनच त्यांनी त्या महिलेला कब्रस्तानात बोलून तिची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. मात्र मी संजय दत्तचा फॅन असून, मला कुणी धोका दिलेला आवडत नाही, असं त्यानं पोलिसांनी सांगितलं होतं. या सायको किलरची चर्चा यूपीत आजही होते.
२. बलात्कार आणि ११ महिलांचा खून
यूपीतच पोलिसांनी अजून एक धक्कादायक घटना दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणली. बरेलीतील नवाबगंज पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाकरजंग येथील कुलदीप गंगवार या सिरीअल किलरला पोलिसांनी अटक केली. त्याला ज्यावेळी पोलिसांनी रिमांडवर घेतलं, त्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. कुलदीपने एक-दोन नव्हे तर आत्तापर्यंत ११ महिलांचा खून केल्याचे समजले. जी महिला त्याला आवडेल तिच्यावर कुलदीप बलात्काराचा प्रयत्न करायचा व नंतर तिचा खून करायचा, अशी माहिती त्याने दिली. या हत्या चोरीच्या उद्देशाने केल्याचे पोलिसांना वाटावे म्हणून खून केल्यानंतर तो महिलेच्या अंगावरील दागिनेही घेऊन जायचा.
३. पोटच्या मुलाचा खून
बंगळुरुच्या माईंडफूल एआय लॅबची सीईओ सूचना सेठ हिला गोव्यात अटक करण्यात आली. तिच्याकडे असणाऱ्या सूटकेसमध्ये तिच्याच मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला. सूचना सेठ हिने तिच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. पोलिसांनी तिची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सूचना हिचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता. कोर्टाने तिच्या नवऱ्याला मुलाला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली होती. कोर्टाची हिच परवानगी, सूचना सेठ हिला आवडली नव्हती. आपल्या नवऱ्याने मुलाला कधीही भेटू नये, अशी तिची इच्छा होती. त्यातून तिने थेट आपल्या मुलालाच संपवले, असे तपासात पुढे आले.
४. महिला डॉक्टरचा खून
कोलकत्ता येथील आरजी कर रुग्णालयात एका महिला डाँक्टरचा खून झाला होता. अत्याचार केल्यानंतर या महिला डाँक्टरची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी १० ऑगस्टला संजय राँय नावाच्या विकृताला अटक केली. त्याने गुन्हाही कबूल केला. संजयची यापूर्वी पाच लग्न झाली होती. मात्र त्याच्या विकृत स्वभावामुळे एकही लग्न टिकले नव्हते. संजयने या महिला डाँक्टरवर अगोदर अत्याचार केला आणि नंतर तिची क्रूरपणे हत्या केली. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती.
५. महालक्ष्मीचे ५९ तुकडे
सप्टेंबर महिन्यात देश पुन्हा हादरला. कर्नाटकातील बंगळूरमध्ये २ सप्टेंबरला महालक्ष्मी नावाच्या महिलेचा खून झाल्याचे समोर आले. तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ५९ तुकडे करुन भरला होता. काही दिवसांनी फ्रिजमधील याच तुकड्यांचा वास यायला लागल्यावर या खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी तपास केल्यावर महालक्ष्मी ही नवऱ्यापासून वेगळी राहात असल्याचे समजले. रंजन राँय नावाच्या उडीसातील व्यक्तीचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होते. याच रंजन राँयने महालक्ष्मीचा खून केला होता. या रंजन राँयच्या तपासासाठी पोलिस उडीसापर्यंत गेले मात्र पोलिसांना पोहोचण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून महालक्ष्मी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचे त्याने लिहून ठेवले होते. या प्रकरणानेही संपूर्ण देशाला चांगलाच धक्का बसला.
६. पाच राज्यात पाच हत्या
काही महिन्यांपूर्वी गुजरात पोलिसांनी राहुलसिंग जाट या हरियाणाच्या दिव्यांग तरुणाला एका खूनाच्या गुन्ह्यात पकडले. मात्र पोलिसांच्या तपासात दिव्यांग असलेला राहुल किती खतरनाक सायको किलर आहे, हे उघड झाले. गुजरातमधील एका १९ वर्षाच्या मुलीची हत्या करुन राहुलने तिच्या मृतदेहावर अनेक तास अत्याचार केला होता. पोलिसांनी त्याची अजून चौकशी केल्यावर राहुल जाट याने हा एकच अत्याचार नाही तर कित्येक अत्याचार केल्याचे उघड झाले. राहुल हा चालत्या ट्रेनमध्ये महिलांवर अत्याचार करुन त्यांचा खून करत होता. विशेष म्हणजे त्याला जेव्हा पकडले त्याच्या दोन दिवस अगोदर त्याने तेलंगणात एका महिलेवर अत्याचार करुन तिचाही खून केला होता. राहुल सिंग जाट याने अकरा दिवसांच्या रेल्वे प्रवासात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या पाच राज्यात पाच बलात्कार व खून केले होते.












Click it and Unblock the Notifications