मोठी बातमी! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, सर्वात मोठी कारवाई
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा, यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुमारे 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती दीपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे हे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे.

या कारवाईमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना कायदेशीर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
नेमका प्रकार काय आहे?
लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी आपल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 10 वर्षांपूर्वी, 2015 मध्ये, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी, त्यांनी 'बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ₹75 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. ही कंपनी जीवनशैली उत्पादनांना प्रोत्साहन देते आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवते.
या कर्जासाठी 12 टक्के व्याजाचा दर निश्चित करण्यात आला होता. काही काळानंतर, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी कोठारी यांना कर्जाचे गुंतवणुकीमध्ये रूपांतर करण्याची विनंती केली आणि मुद्दल व व्याज दर महिन्याला परत करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये शेअर सब्स्क्रिप्शन कराराद्वारे ₹31.95 कोटी हस्तांतरित केले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी पुन्हा सप्लिमेंटरी कराराद्वारे ₹28.53 कोटी हस्तांतरित केले. हे सर्व पैसे 'बेस्ट डील टीव्ही' च्या बँक खात्यात जमा झाले होते.
आश्वासन पाळले नाही, पैशांचा गैरवापर
कोठारी यांनी आरोप केला आहे की, पैसे मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यावर कोणतीही भूमिका बजावली नाही. उलट, त्यांनी घेतलेले ₹60 कोटींचे सर्व पैसे वैयक्तिक गरजांसाठी वापरले. अनेक प्रयत्न करूनही हे पैसे आजपर्यंत परत केले गेले नाहीत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे कोठारी यांची आर्थिक फसवणूक झाली असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय दंड विधानच्या कलम 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात) आणि 120B (गुन्हेगारी कट) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
सध्या हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. आता या दोन प्रसिद्ध व्यक्तींना कायद्याला सामोरे जावे लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications