शेअर बाजारात गोंधळ वाढला; पाकिस्तान- बांगलादेशच्या GDP पेक्षा जास्त नुकसान, 'ही' आहेत कारणे?
भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षीपासून घसरण सुरु आहे. हाच ट्रेंड आता पहिल्या दोन महिन्यांतही राहिलाय. सरकारने अनेक घोषणा करुनही सेन्सेक्स व निफ्टी सावरताना दिसत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, शेअर बाजारात गेल्या दोन महिन्यांत एवढे पैसे गेले आहेत की, पाकिस्तान व बांगलादेशची जीडीपी त्यापेक्षा जास्त आहे. २०२५ सुरु झाल्यापासून शेअर बाजारातील भांडवल हे ४५ लाख कोटी रुपयानी घसरले आहे.

२ महिन्यांत ४५ लाख कोटींची घट
शेअर्स बाजारातील आकडेवारी गेल्या दोन महिन्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त घसरली. ३१ डिसेंबर २०२४ ला बीएसई मार्केट कॅप ४४३.४७ लाख कोटी रुपये होते. ते आता ३९८.४६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. मिडकॅप व स्माँल कॅप मधील तीव्र घसरणीमुळे शेअर बाजारला सावरायला संधीच मिळालेली नाही. फेब्रुवारी महिन्यात आत्तापर्यंत २६ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. यात जानेवारीची घट विचारात घेतली तर, ती ४५ लाख कोटींपर्यंत जाते.
परदेशी गुंतवणुकदारांची उदासिनता
भारतीय बाजारपेठांबाबत परदेशी गुंतवणूकदार उदासीन वृत्ती स्विकारताना दिसत आहेत. त्याऊलट जपान व चीनसारख्या बाजारपेठेत गुंतवणूक वाढत आहे. भारताच्या तुलनेत या दोन्ही देशांतील गुंतवणुकीवर परदेशी गुंतवणूकदार भर देताना दिसत आहेत. बीओएफए सिक्युरिटीज फंड मॅनेजमेंटच्या मासिक सर्वेक्षणात फेब्रुवारीत जागतीक निधीद्वारे भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी पसंतीचा शेअर्स बाजार होता. थायलंड या यादीत अव्वल स्थानावर होता. त्यांचा निधी २२ टक्के कमी वजनाचा तर भारताचा निधी १९ टक्के कमी वजनाचा नोंदवला गेला.
काय आहेत कारणे?
भारतीय शेअर्स बाजारचा विचार केला तर देशातील टाँप-१० गुंतवणुकदारांचे गेल्या दोन महिन्यात ४.४१ टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे अनेक कारणे असल्याचे सांगितले जाते. त्यात पहिले कारण आहे, अमेरिकन डाँलरच्या सततच्या मजबुतीमुळे गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेऐवजी अमेरिकेला पसंती देत आहेत. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच टेरिफ वाँर सुरु केलाय. कॅनडा, मॅक्सिको, चीन आणि भारताला परस्पर टेरिफ लावण्यची धमकी त्यांनी दिलीय. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
सोमवारी निफ्टी कोसळला
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टी १५० अंकांनी घसरला. शुक्रवारी अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स व एस अँण्ड पी ५०० मध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचाच परिणाम भारतीय बाजारात सोमवारी दिसला. बाजार सुरु झाल्यानंतर काही वेळातच बीएसई सेन्सक्स ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तर एनएसई निफ्टी २०० पेक्षा जास्त अंकानी घसरला.












Click it and Unblock the Notifications