चीनच्या भूमीतून पाकिस्तानवर राजनाथ सिंह यांचा कडाडून हल्ला, चीनसमोरचं झाप झाप झापलं...
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या व्यासपीठावरून थेट पाकिस्तानला लक्ष्य करत त्याच्या दहशतवादी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनमध्ये भर परिषदेत हे वक्तव्य करत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका जगासमोर ठामपणे मांडली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "आपल्या भागात शांतता आणि सुरक्षेला सर्वात मोठे धोके म्हणजे वाढता अतिरेकीपणा, दहशतवाद आणि परस्पर अविश्वास आहे. अशा परिस्थितीत काही देश दहशतवादाचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत आहेत. हे देश दहशतवाद्यांना आश्रय देतात, प्रशिक्षण देतात आणि त्यांच्या हालचालींना पाठिंबा देतात. अशा दुटप्पी भूमिकेला आता थारा दिला जाणार नाही."
भारताची ठाम भूमिका : 'दहशतवाद्यांना ठेचून काढू'
सिंह यांनी पुढे सांगितले की, "दहशतवादाच्या वाढत्या सावटाला रोखण्यासाठी निर्णायक पावले उचलणे आवश्यक आहे. दहशतवादी गटांशी झुंज देण्यासाठी देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जे देश दहशतवाद पोसतात, त्यांनी त्याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे. आम्ही आमच्या सीमांचे संरक्षण करण्याचा हक्क बजावतो आणि गरज भासल्यास कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही."
ऑपरेशन सिंदूरचा अप्रत्यक्ष उल्लेख
एप्रिल 2025 मध्ये झालेल्या काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांवर लक्ष्य करून त्यांची मोहीम उद्ध्वस्त केली होती. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांपुरतीच मर्यादित नव्हती, तर पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेलाही धक्का देणारी ठरली होती. या कारवाईनंतर राजनाथ सिंह यांनी जी भूमिका मांडली, ती संपूर्ण SCO परिषदेत ठळकपणे उमटली.
'दहशतवाद्यांची केंद्रे सुरक्षित राहिलेली नाहीत' - राजनाथ सिंह
"भारतानं दहशतवाद कुठून पोसला जातोय हे जगाला दाखवून दिलं आहे. आता ही केंद्रं सुरक्षित नाहीत. भारतानं वेळ आल्यास कारवाई करून दाखवलं आहे की, आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. अशा कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि गरज भासल्यास निर्णायक पावलं उचलू," असे ठाम शब्दांत राजनाथ सिंह यांनी सांगितले.
SCO सदस्य देशांना ठाम भूमिका घेण्याचे आवाहन
यावेळी राजनाथ सिंह यांनी SCO सदस्य देशांनीही दहशतवादाच्या विरोधात एकमताने उभं राहावं आणि अशा देशांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा, असं स्पष्ट आवाहन केलं. दहशतवादासारख्या जागतिक संकटात निष्क्रीय भूमिका घेणं हे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications