हृदयद्रावक! राजस्थानात भाविकांच्या वाहनाला भीषण धडक; देवदर्शनावरुन परतताना 15 जण जागीच ठार!
Rajasthan Accident : राजस्थानमधील फलोदी जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मतोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतामाला एक्स्प्रेस वेवर एका भीषण रस्ते अपघातात १५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोलायत मंदिरातून देवदर्शन करून परतणाऱ्या या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा मोठा अनर्थ घडला.

नेमका कसा घडला अपघात?
अपघाताचे ठिकाण
राजस्थानमधील फलोदी जिल्ह्यातील मतोडा पोलीस ठाण्याची हद्द, भारतामाला एक्स्प्रेस वे, हनुमान सागर भाग.
अपघाताचे स्वरूप
जोधपूरच्या सुरसागर येथील भाविकांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत भाविक जोधपूरच्या सुरसागर भागातील रहिवासी होते.
प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पो ट्रॅव्हलरचा अतिवेग आणि कमी दृश्यमानता यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नाही, हे अपघाताचे प्रमुख कारण मानले जात आहे.
Rajasthan CM Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) posts, "फलोदी के मतोडा क्षेत्र में सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुखद एवं हृदयविदारक है। मेरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं। जिला प्रशासन के अधिकारियों को सभी घायलों का समुचित उपचार सुनिश्चित करने हेतु निर्देश दिए गए हैं।… pic.twitter.com/L93eutoYzE
— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2025
बचावकार्य आणि सद्यस्थिती
फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. या भीषण अपघातात ३ जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून 'ग्रीन कॉरिडॉर' करून अधिक उपचारांसाठी त्यांना जोधपूरला पाठवण्यात आले आहे. फलोदीचे डीएसपी अचलसिंह देवडा यांनी सांगितले की, अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा अक्षरशः चक्काचूर झाला.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांना टेम्पो ट्रॅव्हलरमधील मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, कारण मृतदेह ट्रॅव्हलरच्या सीट आणि लोखंडात अडकले होते. जोधपूर पोलीस आयुक्त ओमप्रकाश माथूर यांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताची माहिती घेतली आणि तपास सुरू केला आहे.
राजकीय नेत्यांकडून दुःख व्यक्त
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या रस्ते अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील अपघाताच्या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना या संकटातून बाहेर पडण्याची हिंमत मिळो, अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications