अमेरिका-भारत व्यापार करारावर राजकीय घमासान; मोदींनी देश विकल्याचा राहुल गांधींचा आरोप
भारत आणि अमेरिका यांच्यात जाहीर झालेल्या नव्या व्यापार करारावरून देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल करत, "मोदींनी देश विकला आहे" असा गंभीर आरोप केला आहे. याला उत्तर देताना सरकारकडून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत असा पलटवार केला असून, कृषी व दुग्ध क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

"तुमचा घाम, रक्त विकले गेले" - राहुल गांधींचा गंभीर आरोप
मंगळवारी बोलताना राहुल गांधी म्हणाले, तुमचे कष्ट, तुमचा घाम आणि रक्त विकले गेले आहे. अमेरिकेशी तडजोड करण्यात आली आहे आणि त्यात देशाचे नुकसान झाले आहे."
राहुल गांधींनी आरोप केला की, नरेंद्र मोदी घाबरले आहेत. ज्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली, तेच आता ती उद्ध्वस्त करत आहेत. अमेरिकेत अदानीविरोधात सुरू असलेला खटला हा प्रत्यक्षात मोदींविरोधातला खटला आहे. हा मोदींच्या आर्थिक मॉडेलवरच हल्ला आहे.
अदानी प्रकरण आणि 'एपस्टाईन फाइल्स'चा उल्लेख
राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला. "एपस्टाईन फाइल्समध्ये अजून बरेच काही आहे, जे अमेरिकेने जाहीर केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधानांवर दबाव आहे. हे दोन दबावाचे मुद्दे आहेत - अदानी प्रकरण आणि एपस्टाईन फाइल्स," असे ते म्हणाले. त्यामुळेच, "पंतप्रधानांशी तडजोड केली जात आहे, हे देशाने समजून घ्यायला हवे," असा आरोप राहुल गांधींनी केला.
"इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही"
राहुल गांधी म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले गेले नाही. हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. जनतेने याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राहुल दिशाभूल करत आहेत - पियुष गोयल
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी संध्याकाळी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. कृषी आणि दुग्ध क्षेत्राचे संरक्षण केले जाईल. या करारामुळे भारताच्या हितालाच फायदा होणार आहे. लवकरच भारत आणि अमेरिका या करारावर संयुक्त निवेदन जारी करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पियुष गोयल यांच्या विधानातील ४ महत्त्वाचे मुद्दे
मोदी-ट्रम्प संबंधांचा फायदा
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांचा उपयोग करून भारतासाठी सर्वोत्तम व्यापार करार मिळवला.
१.४ अब्ज भारतीयांसाठी संधी
या करारामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकरी, मच्छीमार, तरुण, महिला व गरीब घटकांसाठी नव्या संधी निर्माण होतील.
संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण
कृषी आणि दुग्ध क्षेत्रांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. निर्यात, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रात उत्साह आहे.
विरोधकांवर टीका
"राहुल गांधी आणि विरोधकांची मानसिकता संकुचित आहे. त्यांना भारताचे उज्ज्वल भविष्य नको आहे," अशी टीका गोयल यांनी केली.
ट्रम्प यांची मोठी घोषणा: 50% कर थेट 18% वर
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारत-अमेरिका व्यापार कराराची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भारतावरील 50% आयात कर 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. भारत अमेरिकेकडून आणि व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करेल.
भारत 500 अब्ज डॉलर्सची खरेदी करेल; ट्रम्प
ट्रम्प यांनी Truth Social या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले, "भारत आमच्याकडून ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर उत्पादने खरेदी करेल." यामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचा जोरदार हल्ला: शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड?
या करारानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर लिहिले, "मोगॅम्बो वॉशिंग्टनमध्ये आनंदी आहे. पंतप्रधान मोदींनी अखेर पराभव स्वीकारला आहे." काँग्रेसने अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांच्या विधानाचा हवाला देत म्हटले की, "अमेरिकन शेतकऱ्यांची उत्पादने भारतीय बाजारात विकली जातील. हे भारतीय शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे."












Click it and Unblock the Notifications