नितीश कुमारांचा विक्रम! दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'ते' राजकारणात कसे आले? जाणून घ्या कारकीर्द
Nitish Kumar swearing-in ceremony Marathi News : बिहारच्या राजकारणात 'पलटू राम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता दल (यू) नेते नितीश कुमार यांनी आज, २० नोव्हेंबर २०२५ रोजी इतिहास रचला! त्यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नितीश कुमारांची सुरुवात 'जेपी आंदोलना'तून
नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९७० च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून झाली. या आंदोलनाने अनेक युवा नेत्यांना राजकारणात आणले आणि नितीश कुमार त्यापैकीच एक प्रमुख चेहरा होते.
पहिली निवडणूक: १९८५ मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभा निवडणूक लढले, पण जिंकू शकले नाहीत.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश: १९८९ मध्ये ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आणि इथूनच त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाची यात्रा सुरू झाली.
२००५ पासून 'सत्ता' त्यांच्या हाती
- नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रवास काहीसा अस्थिर पण दमदार राहिला आहे.
- पहिले मुख्यमंत्रीपद (२०००): ते पहिल्यांदा २००० मध्ये मुख्यमंत्री बनले, पण हे सरकार केवळ सात दिवस टिकलं.
- २००५ पासून वर्चस्व: यानंतर ते २००५, २०१०, २०१५, २०१७, २०२० आणि २०२२ मध्ये मुख्यमंत्री बनले. आज (२०२५) त्यांनी दहाव्यांदा शपथ घेऊन बिहारच्या राजकारणात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करणाऱ्या नेत्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण योगदान
- जनता दलातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या नितीश कुमारांनी केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.
- विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
- १९९४ मध्ये त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली.
- केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री, कृषी मंत्री आणि वाहतूक मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली.
राजकीय वळणे आणि 'पलटू राम' वृत्ती
- २०१३ मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याच्या भाजपच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आणि जेडीयूला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर काढले.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या खराब कामगिरीनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण फेब्रुवारी २०१५ मध्ये ते पुन्हा पदावर आले.
- नोव्हेंबर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलासह युती करून भाजपचा पराभव केला आणि बहुमत मिळवून मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.
- तेव्हापासून त्यांनी भाजप आणि आरजेडीसोबत युती तोडत आणि जोडत बिहारच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहून आपले राजकीय कसब सिद्ध केले आहे.












Click it and Unblock the Notifications