लखनऊमध्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी क्षणात कोसळली तीन मजली इमारत, 8 जणांचा मृत्यू 28 जखमी
Lucknow building collapsed update : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये शनिवारी संध्याकाळी तीन मजली इमारत कोसळली. ढिगा-याखाली गाडले गेल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 28 जण जखमी झाले आहेत. इमारतीत फार्मास्युटिकल आणि इंजिन ऑइल कंपन्यांसह चार गोदामे होती, ज्यात 30 पेक्षा जास्त लोक काम करत होते. रात्रभर बचावकार्य सुरूच होते.
या दुर्घटनेतील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीही पोलिसांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतलेली होती. पण ही इमारत अचानक कशी कोसळली? याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पुरामुळे इमारतीचा पाया पाणी साठल्याने कमकुवत झाला होता असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

स्थानिकांच्या म्हण्यानुसार याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही या समस्येकडे लक्ष दिले गेले नाही. ट्रान्सपोर्ट नगर चेंबर ऑफ कॉमर्स आणि वेअरहाऊसचे प्रवक्ते राज नारायण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पाणी साचले नसते तर ही घटना घडली नसती. दुसरीकडे, डीएम म्हणाले की, तपासानंतरच स्पष्ट कारण स्पष्ट होईल. तर एलडीएने दिलेल्या माहितीनुसार इमारतीचा नकाशा 31 ऑगस्ट 2010 रोजी पास करण्यात आला होता.
का घडली दुर्घटना
पोलिस उपायुक्त आरएन सिंह म्हणाले, "कालपासून आमचे बचाव कार्य सुरू आहे, ज्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 28 लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही पुढील 5-6 तासांत मध्ये बचाव कार्य पूर्ण करू. जखमींची प्रकृती ठीक आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या इमारतीचा वापर गोदाम म्हणून केला जात होता. इमारतीच्या तळमजल्यावर मोटार वर्कशॉप व गोडाऊन, पहिल्या मजल्यावर मेडिकल गोडाऊन, दुसऱ्या मजल्यावर कटलरीचे गोडाऊन असल्याचे त्यांनी सांगितले.
मेडिकलच्या गोडाऊनमध्ये काम करणारा आणि अपघातात जखमी झालेला आकाश सिंग याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, पावसामुळे आम्ही खाली उतरून तळमजल्यावर आलो. आम्हाला इमारतीच्या एका खांबाला तडा दिसला. अचानक, संपूर्ण इमारत आमच्या वर कोसळली." जखमींच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी इमारतीत काम करणारे बहुतांश लोक तळमजल्यावर होते.
जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव कार्य आता ढिगाऱ्यात कोणीही अडकणार नाही याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मदत आयुक्त कुमार यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे बचाव पथक मदतकार्यात गुंतले आहे. ते म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.












Click it and Unblock the Notifications