'खतम... टाटा बाय-बाय...' काँग्रेस स्वतःसाठी नाही तर आपच्या पराभवासाठीच लढली?
आज जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसला. एकेकाळी दिल्लीत सत्ता असणाऱ्या काँग्रेसने मात्र आपल्या खराब कामगिरीचा फार्म कायम ठेवला. सलग तिसऱ्यांदा पक्षाला येथे भोपळाही फोडता आला नाही. यंदा मात्र काँग्रेसने स्वतःच्या पराभवापेक्षा आपच्या पराभवात मोलाची कामगिरी बजावली. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया यासारख्या आपच्या दिग्गज नेत्यांचा पराभवाचे एक कारण काँग्रेसही राहिले. या नेत्यांना काँग्रेसमुळेच निसटता पराभव पहावा लागला.

काँग्रेसवर मीम्सचा भडिमार
सलग तिसऱ्यांदा काँग्रेसने दिल्लीत असमाधानकारक कामगिरी कायम ठेवली. दिल्लीतील काँग्रेसच्या दारुन पराभवानंतर 'खतम... टाटा, बाय-बाय'वाल्या मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. याशिवाय 'काँग्रेसचे आर्यभट्टवर प्रेम असल्यामुळेच ते ० आणतात...' यासारख्या विनोदी पोस्टही चांगल्याच व्हायरल झाल्या. काँग्रेसला आता आपल्या रणनितीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
काँग्रेसच्या पराभवाची कारणे
दिल्लीतल्या सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रीत न करणे, ग्राऊंड लेव्हलवर संघटना सक्षम नसणे, स्थानिक प्रभावी नेतृत्व नसणे, ही काँग्रेसच्या पराभवाची काही कारणे होती. आता काँग्रेसला या कारणांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे विश्लेषकांना वाटतं. काँग्रेसचा हा दारूण पराभव काँग्रेससाठी चिंतनाचा विषय आहे.
केजरीवाल पराभव काँग्रेसमुळे
काँग्रेसमुळे दिल्लीत मत विभागणी झाली. खरी लढत ही भाजप व आपमध्येच होईल, असे चित्र होते. झालेही तसेच. मात्र काँग्रेसने मतविभागनी केल्यामुळे आपचा पराभव झाल्याचेही दिसले. आपचे नेते अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून निवडणूक लढवत होते. त्यांच्यासमोर भाजपचे प्रवेश वर्मा व काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान होते. या लढतीत भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी ४ हजार ५६८ मते घेतली. म्हणजेच काँग्रेस व आप एकत्र लढली असती तर, केजरीवाल यांचा सहज विजय झाला असता.
काँग्रेसमुळेच सिसोदीयाही पराभूत
आपचे दुसरे नेते मनीष सिसोदीया, हेही काँग्रेसच्या उमेदवारामुळेच पराभूत झाले. जंगपुरा मतदारसंघात त्यांचा भाजपचे उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून ६७५ मतांनी पराभव झाला. तेथे तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे फरदाद सुरी होते. सुरी यांनी ७ हजार ३५० मते मिळवली. येथेही काँग्रेस व आप एकत्र लढली असती तर सिसोदीया यांचा विजय झाला असता.












Click it and Unblock the Notifications