झारखंडमध्ये काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले, विद्यमान आमदारांपैकी दोघांचे तिकीट कटले? पहा कोण आहेत...
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. झारखंडमध्ये यावेळीही काट्याची टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झारखंड निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 21 उमेदवारांमध्ये काँग्रेस पक्षाने 5 महिलांनाही उमेदवारी दिली आहे. शिवाय 15 आमदारांवर काँग्रेसने पुन्हा विश्वास दाखवला आहे.
पहा कुणाला कोठून मिळाले तिकीट
जामतारा येथून काँग्रेसने इरफान अन्सारी यांना तिकीट दिले आहे. रामगडमधून ममता देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हजारीबागमधून मुन्ना सिंग, जमशेदपूर पूर्वमधून डॉ. अजय कुमार, हटियामधून अजय नाथ सहदेव, सिमडेगामधून भूषण बारा यांना तिकीट मिळाले आहे. काँग्रेसच्या विद्यमान 17 आमदारांपैकी 15 जणांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे पाकूरचे आमदार आलमगीर आलम आणि बार्हीचे आमदार उमाशंकर अकेला या दोन विद्यमान आमदारांची नावे रोखून धरण्यात आली आहेत. आलमगीर आलम हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी किंवा मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अकेला यांना काँग्रेस यावेळी तिकीट देईल की नाही याबाबत शंका कायम आहेत.

काँग्रेसकडून पाच महिलांनाही संधी
काँग्रेसच्या 21 उमेदवारांमध्ये 5 महिलांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये दीपिका पांडे सिंह, अंबा प्रसाद साहू, ममता देवी, पूर्णिमा नीरज सिंह आणि शिल्पी नेहा टिर्की यांचा समावेश आहे. त्यापैकी चार जण गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. शिल्पी नेहा टर्की या पोटनिवडणूक जिंकून आमदार झाल्या होत्या. पक्षाने हातियामधून अजयनाथ शाहदेव आणि मांडूमधून जयप्रकाश भाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मांडू जागेवर झारखंड मुक्ती मोर्चा ठाम होता, पण अखेर ही जागा काँग्रेसकडे गेली. शिक्षेवर बंदी घातल्यानंतर ममतादेवी पुन्हा रामगडमधून मैदानात उतरल्या आहेत. एका फौजदारी खटल्यात दोषी ठरल्यानंतर ममतादेवी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला.
दोन टप्प्यात होणार मतदान
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications