दिल्लीत रंगले फोटोपुराण; आपच्या आरोपानंतर भाजप म्हणते, आंबेडकर-भगतसिंगांच्या फोटोची फक्त जागा बदलली
दिल्लीत भाजपने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या. मात्र आज सोमवारी दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी (आप) गोंधळ घातला. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी आरोप केला की, दिल्लीत भाजप सत्तेत येताच मुख्यमंत्री कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आले. भाजपची मानसिकता शीख आणि दलितविरोधी असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. त्यानंतर लगेचच भाजपनेही या आरोपाचे खंडन केले. फोटो काढले नाही तर फक्त जागा बदलली, असं स्पष्टीकरण भाजपच्यावतीने देण्यात आलं.

काय होता आरोप?
सोमवारी दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी (आप) गोंधळ घातला. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी आरोप केला की, दिल्लीत भाजप सत्तेत येताच मुख्यमंत्री कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आले. भाजपची मानसिकता शीख आणि दलितविरोधी असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. तसेच भाजपने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्लीतील महिलांना २५०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणीही केली.
भाजपचे ताबडतोप प्रत्युत्तर
आतिशीच्या आरोपांनंतर सुमारे २ तासांनी दिल्ली भाजपने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयाचा एक नवीन फोटो प्रसिद्ध केला. यामध्ये रेखा गुप्ता यांच्या आसनामागील भिंतीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि महात्मा गांधी यांचे फोटो दिसत आहेत. जवळच्या भिंतीवर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो आहेत. फोटो काढले नाहीत तर फक्त फोटोंची जागा बदलली, असे भाजपतर्फे सांगण्यात आले. भाजप नेते प्रवेश वर्मा म्हणाले, आपच्या लोकांकडे काहीच काम नाही. गेल्या १० वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. मात्र आज सभागृहाचे पावित्र्यही भंग केले. तरविंदर सिंग मारवाह म्हणाले, कोणताही फोटो काढलेला नाही. त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आम्हाला वाटले की फक्त अरविंद केजरीवाल हेच खोटे बोलणारे व्यक्ती आहेत. पण दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आतिशी त्यांच्या पुढे आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही केला आरोप
आपच्या फोटोंच्या आरोपानंतर भाजपने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री कार्यालयातील सगळ्या भिंतीवरील फोटो दाखवले. आपचे नेते फक्त आरोप करण्यात पटाईत आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कॅगचे सर्व १४ प्रलंबित अहवाल विधानसभेच्या या अधिवेशनात सादर केले जातील. 'आप' सरकारच्या चुकीच्या दारू धोरणामुळे दिल्लीला २०२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले असल्याचे सांगितले.












Click it and Unblock the Notifications