चेहरा बदलला पण 'आप'चे भ्रष्टाचारी चारित्र्य तेच; आतिशी CM होताच भाजप अन् काँग्रेसचा हल्लाबोल
आतिशी या दिल्लीचे नव्या मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर, आम आदमी पार्टीतील आमदारांच्या अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर मंगळवारी आतिशी यांच्या रूपाने नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या तिसऱ्या महिला नेत्या आहेत. दिल्लीतील सत्ताबदलावर प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चेहरा बदलला पण पक्षाचे भ्रष्टाचाराचे चारित्र्य तेच आहे, असे भाजपने म्हटले आहे.
केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी यांना दिल्लीचे नव्या मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणेच्या वृत्तावर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मजबुरीतून नवा मुख्यमंत्री बनवला आहे कारण त्यांची इच्छा असूनही त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मुख्यमंत्री करू शकले नाही. मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यावरून आतिशी यांच्याकडे सर्व खाती देण्यात आली आणि आता त्यांच्या दबावाखाली आतिशी यांना दिल्लीचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, "मी म्हणतोय की चेहरा बदलला आहे पण आपचे भ्रष्ट चारित्र्य तेच आहे."

दिल्लीची जनता उत्तर देईल : भाजप
या निवडीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, "आप सरकार त्या व्यक्तीला पाठिंबा देते ज्याच्या कुटुंबाने अफजल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील जनता नक्षल समर्थकांना कधीही स्वीकारणार नाही. ते पुढे म्हणाले, "आम आदमी पार्टीला हे देखील दाखवायचे आहे की ते महिलांना कठपुतळी मानतो, कारण सौरभ भारद्वाज म्हणत होते की नवे मुख्यमंत्री कठपुतळी मुख्यमंत्री असतील. दिल्लीतील जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.
मुख्यमंत्र्याचा चेहरा बदलण्याने फरक नाही : संदीप दीक्षित
आतिशी यांच्या निवडीवरही काँग्रेसने हल्लाबोल केला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, आम आदमी पार्टी हा लबाड आणि लुटमारीचा पक्ष आहे. 'आप'मध्ये केजरीवाल हेच सर्वस्व आहेत. जो येईल तो लुटणार. मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून काही फरक पडणार नाही.
'आप'ला नष्ट करण्याचा भाजपचा डाव- गोपाल राय
दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय म्हणाले, आज दिल्ली आम आदमी पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आतिशी यांची एकमताने पुढील मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असून पुढील निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी लागली आहे.
"केंद्रातील भाजप सरकार, संपूर्ण भाजप, देशाच्या पंतप्रधानांनी 'आप'ला संपवण्याचा कट रचला आणि अनेक तपास यंत्रणांचाही गैरवापर केला. ज्याप्रमाणे अनेक निवडून आलेली सरकारे पाडण्यात आली, त्याचप्रमाणे दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. "असे सर्व प्रयत्न अयशस्वी करून, 'आप'ने आपली एकजूट आणि कार्य चालू ठेवले."
गोपाल राय म्हणाले, "त्यांनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातूनच राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विरोधक सरकार पाडू शकतील. पण दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून राजीनामा न देण्याचा आणि तिथून सरकार चालवण्याचा निर्णय घेतला. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.












Click it and Unblock the Notifications