Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमित शहांची लोकसभेत गर्जना; 'ऑपरेशन सिंदूर' ते 'महादेव'पर्यंतचा खुलासा, युद्धबंदी का व कशी केली?

Amit Shaha Speaking in Lok Sabha : आज मंगळवारी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील चर्चेने सभागृह दणाणून गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणातून या दोन्ही ऑपरेशन्सचे तपशील दिले आणि दहशतवादाविरोधात भारत सरकारची कणखर भूमिका स्पष्ट केली. सोमवारी, 28 जुलै रोजी पाच दिवसांच्या गतिरोधानंतर सुरू झालेल्या या चर्चेसाठी लोकसभेच्या कामकाजाची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती, यावरूनच या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात येते.

चर्चेची सुरुवात करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' हे केवळ एक "विराम" आहे आणि जर पाकिस्तानने कोणतीही नवीन कुरापत काढली, तर लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल. यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात अत्यंत कठोर शब्दांत पहलगाम हल्ल्याचा निषेध करत, 'ऑपरेशन महादेव' मध्ये मारले गेलेले तिन्ही दहशतवादी या हल्ल्यात सहभागी असल्याचे ठोस पुराव्यासह सांगितले.

Amit Shaha Speaking in Lok Sabha

अमित शाह यांचे लोकसभेतील महत्त्वाचे मुद्दे

अमित शाह यांनी आपल्या भाषणात दहशतवाद आणि दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या भाषणातील खालील मुद्दे, वाचा सविस्तर..!

पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध

शाह यांनी पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. "पहलगाममध्ये जे घडले ते अत्यंत क्रूर होते. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो," असे ते म्हणाले. दहशतवाद्यांनी कुटुंबासमोरच नागरिकांचा धर्म विचारून हत्या केल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

'ऑपरेशन महादेव' - हल्लेखोरांचा खात्मा

गृहमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे 'ऑपरेशन महादेव' राबवले. या कारवाईत सुलेमान उर्फ फैजल (लष्कर-ए-तैयबाचा 'ए-ग्रेड' कमांडर), अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी ठार झाले. हे तिघेही २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी होते, असे शाह यांनी पुराव्यासह सांगितले. "बैसरन खोऱ्यात आपल्या नागरिकांना मारणारे हे तीन दहशतवादी मारले गेले आहेत," असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

दहशतवाद्यांचे पुरावे आणि मदत करणाऱ्यांवर कारवाई

शाह यांनी दहशतवाद्यांच्या ओळखीचे पुरावे सादर केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणले असता, त्यांना आश्रय देणारे आणि अन्न पुरवणारे जे लोक आधीच अटक करण्यात आले होते, त्यांनी या दहशतवाद्यांची ओळख पटवली. तसेच, हल्ल्यात वापरलेल्या गोळ्यांचा एफएसएल (FSL) अहवाल आधीच तयार होता आणि 'ऑपरेशन महादेव'मध्ये जप्त केलेल्या रायफल्सच्या गोळ्यांशी तो जुळल्याचे चंदीगडमधील तपासणीत निश्चित झाले.

हे तीन दहशतवादीच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचे यातून सिद्ध झाल्याचे शाह यांनी सांगितले. त्यांच्याकडे पाकिस्तानात बनवलेल्या चॉकलेट्स आणि मतदार ओळखपत्र क्रमांक सापडल्याचा उल्लेख करत, ते पाकिस्तानी असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शहीद कुटुंबियांच्या भेटीचा उल्लेख

पहलगाम हल्ल्यानंतर आपण पीडित कुटुंबियांना भेटल्याचे शाह यांनी सांगितले. लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनी विधवा झालेल्या महिलेचा उल्लेख करताना ते म्हणाले, "मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही. मोदीजींनी दहशतवादी पाठवणाऱ्यांना संपवले आहे आणि आमच्या सुरक्षा दलांनी ही हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारले आहे, असे मी सर्व कुटुंबियांना सांगू इच्छितो."

विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

अमित शाह यांनी आपल्या भाषणात विरोधकांवरही निशाणा साधला. "मला अपेक्षा होती की जेव्हा विरोधकांना कळेल की पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मारले गेले आहेत, तेव्हा ते आनंदी होतील, परंतु तसे झाले नाही," असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते पुढे म्हणाले, "'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवादी पाठवणाऱ्यांना मारले आणि 'ऑपरेशन महादेव'ने हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मारले. मला वाटले की या बातमीनंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांमध्येही आनंदाची लाट येईल, परंतु त्यांचे चेहरे काळ्या शाईने झाकलेले आहेत. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे?"

काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर

कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी "दहशतवादी पाकिस्तानातून आले आहेत याचा काय पुरावा आहे?" असे विचारल्याबद्दल शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "मी त्यांना विचारू इच्छितो की ते पाकिस्तानचे रक्षण का करत आहेत? यातून त्यांना काय मिळणार? १३० कोटी लोक पाहत आहेत की ते पाकिस्तानला वाचवण्यासाठी कट रचत आहेत," असे प्रत्युत्तर शाह यांनी दिले. राहुल गांधींच्या पहलगाम दौऱ्याच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यावेळी पंतप्रधान मोदी परदेशात होते.

'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानला इशारा

अमित शाह यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी १०० हून अधिक दहशतवादी मारले. यानंतर भारताच्या डीजीएमओने पाकिस्तानच्या डीजीएमओला कळवले की भारताने स्वसंरक्षणाच्या अधिकाराखाली त्यांच्या क्षेत्रातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला केला आहे. "हे मनमोहन सिंग सरकारसारखे असू शकत नाही जिथे दहशतवादी येतात आणि आमच्या लोकांना मारतात आणि आम्ही गप्प बसतो. काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही त्या दहशतवाद्यांना संपवले ज्यांनी भारताला रक्ताने रंगवले होते," असे म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+