पंजाबमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; 'आप'वर सर्वच पक्षांचा जोरदार हल्लाबोल
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पुतळ्यावर एका माथेफिरुने हातोड्याने वार केला. या प्रकारानंतर विरोधी पक्षांनी अरविंद केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पार्टीवर चौफेर हल्ला चढवला. विशेष म्हणजे आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना प्रजासत्ताक दिनी पोलिस ठाण्याजवळ घडली. त्यामुळे ही आणखी गंभीर बाब असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मायावतींचा जोरदार हल्ला
दलितांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या बसपच्या अध्यक्षा आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही आपला चांगलेच धारेवर धरले. पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला. मायावती यांनी एक्सवर अनेक पोस्ट लिहिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटमधील परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नष्ट करण्याचा आणि त्याला आग लावण्याचा प्रयत्न झाला. पुतळ्यावर हल्ला करणे आणि संविधानाच्या पुस्तकाजवळ आग लावणे हे लज्जास्पद आहे. सरकारी निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेचा जेवढा निषेध करु तेवढा थोडाच आहे.
भाजपनेही साधला निशाणा
पंजाब सरकारवर निशाणा साधत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 'अमृतसरमधील आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे एका व्यक्तीने हातोड्याने नुकसान केले. पंजाब सरकारच्या नाकावर टिच्चून हा प्रकार घडलाय. हा पुतळा पोलिस ठाण्यासमोर आहे. पुतळा उंच होता, मग आरोपींनी शिडी कुठून आणली? अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'च्या पंजाबमध्ये हा प्रकार घडला तरीही पक्ष गप्प आहे. संबित पात्रा यांनी केजरीवाल यांना आपच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणीही केली. ते म्हणाले, 'अमृतसरमध्ये जे काही घडले ते अरविंद केजरीवाल यांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. केजरीवाल यांनी अमृतसरला जावे, आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
काँग्रेसचे गंभीर आरोप
या संपूर्ण गंभीर प्रकारानंतर मात्र काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर जे आरोप केलेत, त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, 'आम्ही अमृतसरमध्ये प्रजासत्ताक दिनी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि नुकसानीचा निषेध करतो, जिथे काही बदमाशांनी संविधानाची प्रतही जाळली. हे सर्व देशासाठी चांगले नाही. आप 'देशद्रोही' असल्याचा पुनरुच्चार माकन यांनी केला. पंजाबमध्ये गुंड आणि कट्टरपंथीयांचे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला. आप हा पक्ष देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका आहे आणि आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो,' असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा
माकन हे ज्या पत्रकार परिषदेत आप आणि त्यांच्या नेत्यांना कोंडीत पकडत होते. तेथेच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा हेही उपस्थित होते. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर खलिस्तानवाद्यांच्या भीतीने फरीदकोटमध्ये तिरंगा फडकवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, 'हे आव्हान म्हणून घेण्याऐवजी मान पटियालाला पळून गेले. पंजाबच्या इतिहासात दहशतवादाच्या अत्यंत बिकट दिवसांतही कोणताही मुख्यमंत्री किंवा मंत्री अशा प्रकारे पळून गेल्याची घटना घडली नाही.












Click it and Unblock the Notifications