सावधान! गरोदरपणात पायांना सूज आणि वेदना होतायत? असू शकतो 'DVT' चा धोका; वेळीच ओळखा लक्षणे
DVT In Pregnancy : आई होण्याचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष नको! असे म्हणणेच येथे उचित ठरेल कारण प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्वाचा प्रवास हा विस्मयकारी असतो आणि हा प्रवास सुखाचा असावा, अशीच इच्छा असते. मात्र, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. पण गरोदरपणात पायांना सूज येणे ही सामान्य गोष्ट मानली जाते, पण प्रत्येक वेळी ती सामान्यच असते असे नाही. वैद्यकीय भाषेत याला 'डीप व्हेन थ्रोम्बोसिस' (DVT) असे म्हणतात. हा एक 'सायलेंट' आजार असून योग्य वेळी उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

बोल्ड स्कायने दिलेल्या वृत्तानुसार, मदरहुड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉ. सुरभि सिद्धार्थ यांच्या मते, या काळात रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या वाढते, ज्यामुळे नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका असतो. यालाच DVT म्हणतात. योग्य खबरदारी घेतल्यास या धोक्यातून सुरक्षितपणे बाहेर पडता येते, हाच सर्वात मोठा दिलासा आहे.
काय आहे DVT?
DVT म्हणजे शरीरातील खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होणे. प्रामुख्याने ही समस्या पायांमध्ये उद्भवते. जर ही रक्ताची गाठ नसांमधून प्रवास करत फुफ्फुसांपर्यंत किंवा मेंदूपर्यंत पोहोचली, तर 'पल्मोनरी एम्बोलिझम' किंवा स्ट्रोकसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका
पायांना सूज: अचानक एका किंवा दोन्ही पायांना सूज येणे.
नसांमध्ये वेदना: पायांच्या मांड्या किंवा पिंडऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे.
त्वचेचा रंग बदलणे: पाय लाल होणे किंवा स्पर्श केल्यावर त्वचा गरम लागणे.
जडपणा: चालताना पायात प्रचंड जडपणा जाणवणे.
कोणत्या महिलांना आहे जास्त धोका
- १. ज्यांचे वजन जास्त आहे
- . २. ज्यांना डॉक्टरांनी दीर्घकाळ 'बेड रेस्ट' सांगितली आहे.
- ३. सिझेरियन डिलिव्हरी झालेल्या महिला.
- ४. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे
- ५. ज्यांचा जुना DVT चा इतिहास आहे.
बचावासाठी तज्ज्ञांचा सल्ला: या गोष्टी करतील मदत
हायड्रेटेड राहा: दिवसभरात भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास रक्त घट्ट होण्याचा धोका वाढतो.
हलकी हालचाल: डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रीनेटल एक्सरसाइज किंवा दररोज थोडा वेळ चालण्याचा सराव करा.
दीर्घकाळ बसणे टाळा: एकाच जागी तासनतास बसून राहू नका. दर तासाला पाय ताणा किंवा थोडी हालचाल करा.
कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स: रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष मोजे (Stockings) वापरा.












Click it and Unblock the Notifications