डेहराडूनमध्ये डून लिट फेस्टच्या माध्यमातून साहित्य, चित्रपट, इतिहास, नेतृत्व आणि तंत्रज्ञानाचा संगम
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत नॅशनल बुक ट्रस्टतर्फे आयोजित 'डून पुस्तक मेळावा २०२६' मध्ये सध्या 'डून लिट फेस्ट'चा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध विषयांवरील विचारांच्या देवाणघेवाणीसाठी हे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून समोर आले असून, येथे वाचक, विचारवंत आणि कथाकारांची मांदियाळी जमली आहे. साहित्य, चित्रपट, इतिहास, अध्यात्म, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सत्रांद्वारे हा महोत्सव प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

गेल्या काही दिवसांत या महोत्सवात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली. पहिल्या दिवशी, शोध पत्रकार जुपिंदर सिंग यांनी शहीद भगतसिंग यांच्या हरवलेल्या पिस्तूलचा शोध घेतानाचा आपला रंजक प्रवास उपस्थितांसमोर मांडला. लेखिका आणि पटकथा लेखिका अद्वैता काला यांनी "बिटवीन द लाइन्स अँड लेन्स: स्टोरीज ऑफ इंडिपेंडंट इंडिया" या सत्रात कादंबरी, चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या कामाचे अनुभव सांगतानाच, स्वतंत्र भारतातील महिलांच्या बदलत्या प्रतिमेवर प्रकाश टाकला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, वकील आणि लेखक ब्रिजेश देसाई यांनी त्यांच्या 'मोदीज मिशन' या पुस्तकावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीचे जीवन, शिक्षण आणि त्यांच्या नेतृत्वाचा प्रवास यावर विचार मांडले. कादंबरीकार कुलप्रीत यादव यांनी १८५७ च्या उठावातील फारशा परिचित नसलेल्या कथांना उजाळा दिला आणि राव तुला राम यांच्या शौर्याचे दर्शन घडवले. आध्यात्मिक गुरू आचार्य प्रशांत यांनी 'ट्रुथ विदाऊट अपोलॉजी' या सत्रात सत्य, नातेसंबंध आणि अर्थपूर्ण जीवनाचे महत्त्व यावर प्रेक्षकांशी संवाद साधला.
तिसऱ्या दिवशी, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी चित्रपट आणि कथा सांगण्याच्या कलेबद्दलचे आपले अनुभव मांडले. चित्रपटांबद्दलचे त्यांचे सुरुवातीचे आकर्षण, काश्मीरमधील 'रॉकस्टार' चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी यावर त्यांनी भाष्य केले. या महोत्सवाने प्रादेशिक साहित्यिक परंपरांनाही महत्त्वाचे स्थान दिले आहे. ऋची बहुगुणा उनियाल, अर्चना झा आणि बुद्धिनाथ मिश्रा या कवींच्या विशेष काव्य सत्रातून उत्तराखंडच्या समृद्ध काव्यपरंपरेची झलक पाहायला मिळाली. कुमाौनी आणि गढवाली भाषेतील अनुवादित साहित्यावरील एका सत्रात कमला पंत, चंद्रशेखर तिवारी, शशिभूषण बडोनी, बीना बंचवाल, नीता कुकरेती आणि रमाकांत बंचवाल या वक्त्यांनी प्रादेशिक अनुवादांचे सांस्कृतिक महत्त्व आणि त्यातील आव्हानांवर चर्चा केली.
याव्यतिरिक्त, महोत्सवात प्रेरणादायी वास्तविक अनुभवांचीही मेजवानी होती. अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे फायटर पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांच्याशी संवाद साधताना अंतराळ प्रवासातील बारकावे सांगितले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या एका सत्रात, लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी नीरज राजपूत यांच्याशी संवाद साधताना नेतृत्व, निर्णयक्षमता आणि आधुनिक सुरक्षा आव्हानांवर चर्चा केली.
महोत्सवातील आगामी सत्रेही तितकीच वैविध्यपूर्ण असणार आहेत. सुभाषचंद्र बोस यांचे 'मृत्यूनंतरचे जीवन', १९४६ चा नौदल उठाव, 'रीडिंग इंडिया: हिस्ट्री थ्रू इट्स लिटरेचर' आणि 'पेट्रिओटिझम अँड रिव्होल्यूशन: स्टोरीज फ्रॉम इंडियाज पास्ट' यांसारख्या विषयांवरील चर्चांमधून इतिहास आणि राष्ट्रीय अस्मितेचे नवे पैलू समोर येतील. तसेच, नितीन सेठ यांचे 'स्मार्टर मशीन्स, वायझर ह्युमन्स' हे सत्र मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्यातील बदलत्या संबंधांवर प्रकाश टाकेल. विविध विचार आणि विषयांना एकाच छताखाली आणून, डून लिट फेस्ट इतिहासाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या ज्ञान सामायिक करण्यासाठी एक समृद्ध व्यासपीठ निर्माण करत आहे.












Click it and Unblock the Notifications