कॅन्सरला हरवण्यासाठी सरकारने उचललं हे मोठं पाऊल! लवकरच येणार लस! कुणा-कुणाला मिळेल फायदा? घ्या जाणून
Cancer Vaccine : कर्करोग असा दुर्धर आजार आहे की, ही व्याधी लागली की, मृत्यू असे पुर्वी सूत्र होते पण कालांतराने कर्करोगावर संशोधन झाले आणि काही उपचारपद्धतीचा अवलंब सुरु झाला. त्यामुळे काही रुग्णाला जीवदान मिळाले तर अनेकांचे आयुष्य वाढले, असे फार थोडेच रुग्ण आहेत ज्यांना कर्करोगापासून कायमची मुक्ती मिळाली. या कर्करोगाला हरवण्यासाठी त्यावर मात करण्यासाठी अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर लढा सुरु आहे.
देशात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता आता सरकारने काही ठोस पाऊले उचलली आहेत. मुळातः कॅन्सर हा असा शब्द आहे की त्याच्या नावानेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि या धोकादायक आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. भारतातही कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषत: महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची अधिक प्रकरणे दिसून आली आहेत.

लवकरच कॅन्सवर येणार लस
देशातील कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून महिलांमधील वाढता कॅन्सर रोखण्यासाठी लवकरच लस उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रताप राव जाधव यांनी मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही लस 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काय म्हणाले केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री?
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, या कर्करोगावरील लसीवरील संशोधन जवळपास पूर्ण झाले असून येत्या पाच ते सहा महिन्यांत ती उपलब्ध होईल. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, ही लस महिलांमध्ये वाढत्या स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांच्याशी लढण्यास मदत करेल.
लसीशी संबंधित काही खास गोष्टी
कर्करोगावरील लस 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल ज्यामुळे त्यांना कर्करोगाशी लढा देण्यात मदत होईल.
ही लस स्तन, तोंडाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रभावी ठरेल.
कर्करोगावरील रस 5-6 महिन्यांत उपलब्ध होणार
कर्करोगासाठी लस का आवश्यक आहे?
भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. पाळीतील अनियमितता, मासिक पाळीबद्दल कमी जागरुकता आणि खराब जीवनशैली ही कॅन्सर वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी मुख्य कारणे आहेत. केंद्र सरकार या तिन्ही सुपरॲक्टिव्ह कॅन्सरला गांभीर्याने घेत असून, तरुण मुलींमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
कॅन्सरवरील औषध होणार स्वस्त
मुळातः भारतासारख्या विकसनशील देशात कर्करोगाचे रुग्ण वाढतेच आहेत. खराब जीवनशैली आणि काही घटकपदार्थ कर्करोगाला चालना देतात. त्यामुळे कर्करोगावर लस येणे महत्वाचे होते आता काही महिन्यात ती येणार असल्याने दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे कॅन्सरच्या औषधावर सरकारने कोणता मोठा दिलासा दिला हे जाणून घेण्याची गरज आहे. केंद्र सरकार कॅन्सरची औषधे रुग्णांना स्वस्त दरात उपलब्ध करुन देणार आहे. यासोबतच देशातील 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांमध्ये अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications