अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रथमच बोलले काका पवन कल्याण; म्हणाले, लोक संतप्त झाले कारण...
अभिनेता अल्लू अर्जुनचे काका व आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पहिल्यांदाच संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीबाबत मत व्यक्त केले. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला बाहेरील गर्दीबाबत अगोदरच माहिती द्यायला हवी होती, अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले. शिवाय या सगळ्या प्रकरणानंतर पिडीत कुटुंबाची भेट घ्यायला अल्लु अर्जुन किंवा त्याच्या टीमच्या कुणीतरी अगोदरच जायला हवे होते, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले पवन कल्याण
अल्लु अर्जुनच्या अटकेबाबत पवन कल्याण यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, "जी गोष्ट काठीने सोडवता आली असती, ती आता कुऱ्हाडीवर नेण्यात आली आहे. पडद्यामागे नेमकं काय घडलं, याची संपूर्ण माहिती मला नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. मी पोलिसांना दोष देत नाही. ते सुरक्षिततेला प्राधान्य देतात. मात्र थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला परिस्थितीची आधीच माहिती द्यायला हवी होती. तो आत बसल्यानंतरही त्याला ते सांगू शकले असते. तिथून घेऊन जाऊ शकले असते, पण दुर्देवाने तसे झाले नाही."
रोखठोक मत केले व्यक्त
संध्या थिएटमध्ये चेंगराचेंगरी झाली मात्र वेळेवर योग्य ती कृती न केल्याबद्दल पवन कल्याण यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "अल्लू अर्जुनच्या बाजूने कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला लवकर भेट दिली असती तर बरं झालं असतं. रेवतीच्या मृत्यूने मलाही धक्का बसला. हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं गेलं त्यात माणुसकीचा अभाव दिसला. प्रत्येकाने रेवतीच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी, कुटुंबीयांना धीर देण्यासाठी गेलं पाहिजे होतं. पीडितेच्या कुटुंबापर्यंत त्वरित न पोहोचल्यामुळे लोक संतप्त झाले. त्यात फक्त अल्लू अर्जुनला दोषी ठरवणं योग्य नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.












Click it and Unblock the Notifications