बॉलिवूडमधील महान पर्वाचा अस्त! ही-मॅन धर्मेंद्र अनंतात विलीन; सनी देओलकडून मुखाग्नी!
Bollywood He Man Dharmendra Passes Away : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील तब्बल सहा दशके गाजवणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
जुहू येथील निवासस्थानी पोहोचली रुग्णवाहिका
सोमवारी, जुहू येथील धर्मेंद्र यांच्या राहत्या घरी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका पोहोचली. यावेळी चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली. धर्मेंद्र यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची चर्चा सुरू झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक नातेवाईकांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या मुलीही या कठीण वेळी वडिलांच्या घरी पोहोचल्या होत्या.

अर्ध्या तासात 'ही-मॅन'ला अखेरचा निरोप
धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, अतिशय गोपनीय पद्धतीने आणि अत्यंत कमी वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमी
कुणाला काही कळण्यापूर्वीच विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. याच ठिकाणी त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यादेखील उपस्थित असल्याचे दिसून आले.
सनी देओलकडून मुखाग्नी
अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल याने त्यांना मुखाग्नी दिला आणि बॉलिवूडचा हा सुपरस्टार अनंतात विलीन झाला.
राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या.
अफवा आणि देओल कुटुंबीय: या अफवांमुळे देओल कुटुंबीय चांगलेच संतप्त झाले होते. सनी देओलने घराबाहेर जमलेल्या पॅपाराझींना फटकारल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते.
अधिकृत निवेदन नाही
इतके सगळे होऊनही, धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अद्याप देओल कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन (Official Statement) जारी करण्यात आलेले नाही.
'इक्कीस' चित्रपटातील मोशन पोस्टर प्रदर्शित
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या दिवशीच, सोमवारी त्यांच्या आगामी 'इक्कीस' या चित्रपटातील त्यांच्या पात्राचे एक नवे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये धर्मेंद्र यांची व्हॉइस नोट देखील समाविष्ट होती. त्यांचा आवाज ऐकून चाहते अतिशय भावूक झाले होते. या पोस्टर प्रदर्शनाच्या काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
बॉलिवूडमधील एका महान पर्वाचा अस्त!
धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महत्त्वपूर्ण आणि तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!












Click it and Unblock the Notifications