CBSE बोर्डाचा 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; 'या' विद्यार्थ्यांना होणार फायदा!
CBSE Board big decision for students : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या वतीने शाळा आणि पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या वतीने, घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये आता वर्गातील विद्यार्थी संख्या वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता विशेष परिस्थितीत, पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाच्या विभागात (section) ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रामुख्याने, एका वर्गातील विद्यार्थ्यांची मर्यादा ४० असते, परंतु वाढती विद्यार्थीसंख्या आणि मर्यादित जागांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन CBSE च्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला होणार?
CBSE ने स्पष्ट केले आहे की ही वाढीव प्रवेशमर्यादा केवळ विशेष आणि आवश्यक परिस्थितीतच लागू होईल. यामध्ये खालील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
पालकांची बदली झालेले विद्यार्थी
विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचे पालक सैन्य दलात, केंद्र सरकारमध्ये, सार्वजनिक क्षेत्रात किंवा मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत असून त्यांची बदली झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
'अत्यावश्यक पुनरावृत्ती' श्रेणीतील विद्यार्थी
काही कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात पुन्हा प्रवेश घ्यावा लागतो (उदा. अभ्यासक्रमातील अडचणी, गैरहजेरीमुळे), त्यांना ही सूट मिळेल.
गंभीर आजाराने ग्रस्त विद्यार्थी
ज्या विद्यार्थ्यांना गंभीर आजारामुळे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांनाही या नियमाचा लाभ घेता येईल.
वसतिगृह सोडणारे विद्यार्थी
वसतिगृहात न राहता आता दिवसा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही तरतूद लागू होईल.
कामगिरी सुधारण्यासाठी पुन्हा प्रवेश
ज्या विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी पुन्हा त्याच वर्गात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनाही या निर्णयामुळे संधी मिळेल.
या साठी शाळांना काय प्रकिया करावी लागणार?
CBSE ने शाळांना यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. जर एखाद्या विभागात ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असेल, तर त्याची संपूर्ण माहिती रेकॉर्डमध्ये नोंदवणे बंधनकारक असेल:
इयत्ता ९ वी ते १२ वी : या वर्गांसाठी अतिरिक्त प्रवेशाचे कारण CBSE पोर्टलवर अपलोड करावे लागेल आणि ते प्रवेश/माघार नोंदणीमध्ये नमूद करणे आवश्यक असेल.
इयत्ता १ ली ते ८ वी : या वर्गांसाठी अतिरिक्त प्रवेशाचे कारण फक्त प्रवेश/माघार नोंदणीमध्ये नोंदवले जाईल.
याव्यतिरिक्त, ओएएसआयएस (OASIS) पोर्टलवर सर्व प्रकरणांची माहिती देणे देखील शाळांना अनिवार्य असेल.
४५ पेक्षा जास्त प्रवेशांना परवानगी नाही
बोर्डाने हे देखील स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत एका विभागात ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. यासोबतच काही मूलभूत मानके देखील निश्चित करण्यात आली आहेत, ज्यांचे पालन करणे शाळांना आवश्यक आहे:
वर्गाचा आकार : प्रत्येक वर्गाचा आकार किमान ५०० चौरस फूट असावा.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जागा : प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किमान १ चौरस मीटर बिल्ट-अप एरिया उपलब्ध असणे आवश्यक आहे.
हे नियम CBSE संलग्नता उपनियम २०१८ च्या कलम ४.८ अंतर्गत लागू करण्यात आले आहेत, जे शाळांमधील सुविधा आणि जागांशी संबंधित आहेत. या निर्णयामुळे प्रवेशासाठी अडचणीत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications