आंध्रप्रदेश अन् बिहारसाठी भरभरून तर महाराष्ट्राला ठेंगा, राज्यातील काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी
मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प आज जाहीर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आपली थैली उघडली. सितारामन यांचा आजचा सातवा अर्थसंकल्प होता. 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसले नाहीत.
मात्र मोदी सरकार आंध्र प्रदेश आणि बिहारवर मेहरबान झाल्याचं नक्कीच दिसून आलं. त्याउलट महाराष्ट्राच्या हाताला फारसं काही लागलं नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या अर्थसंकल्पाचा महायुती सरकारला काय फायदा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फक्त बिहार-आंध्रप्रदेशवरच मेहेरबानी
देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. चारसौ पार चा नारा देणारे एनडीए आपला जास्त करिश्मा दाखवू शकले नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपला आंध्रप्रदेश आणि बिहारमधील पक्षाचा पाठींबा घ्यावा लागला. त्यानंतर एनडीएचे सरकार अस्तित्त्वात आले.
बिहार आणि आंध्रपदेशच्या कुबड्यांचा प्रभाव अर्थसंकल्पात दिसून आला. आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
बिहारसाठी 26 हजार कोटींची तरतूद
निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात बिहारला मोठी भेट दिली. बिहारच्या बोधगयाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचे, नियोजन अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, बिहारच्या रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासात आम्ही सहकार्य करू.
पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशला 15,000 कोटी देणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. टीडीपीकडून विजयवाड्याजवळील अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवायची आणि विकसित करायची आहे, त्यासाठी त्यांना १५ हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती.
चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारला केंद्र सरकारने सहमती दर्शवली असून, आता अर्थसंकल्पात नवीन भांडवलाच्या बांधकामासाठी निधीची घोषणा केली आहे.
काँग्रेसच्या खासदारांकडून घोषणाबाजी
#WATCH | Delhi: Leaders of the Maha Vikas Aghadi protest against the central government, outside Parliament. pic.twitter.com/QGXEgMnE4C
— ANI (@ANI) July 23, 2024
दरम्यान, अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्यातील काँग्रेसचे खासदार उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications