Year Ender 2024: अश्विन-बुमराहसह या खेळाडूंनी यावर्षी नोंदवले अनेक विक्रम, जाणून घ्या आकडेवारी
Year Ender 2024: भारतीय क्रिकेट संघासाठी 2024 हे वर्ष अत्यंत खास राहिलं आहे. यंदा संघाला 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्यात यश मिळालं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील खेळाडूंसाठी ही मोठी उपलब्धी मानली जाते. हा विजय संघासाठी केवळ अभिमानाचा क्षणच नाही तर क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाचा प्रसंगही होता, कारण 2013 नंतरची ही पहिलीच मोठी ICC ट्रॉफी होती.
भारतीय गोलंदाजांनी कमाल केली
भारतीय फलंदाजांनी यंदाच्या वर्षी आपल्या धमाकेदार कामगिरीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन या गोलंदाजांनी चेंडूने कहर केला. 2024 मध्ये अधिक चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया...

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने 2024 मध्ये मोठी कामगिरी केली आहे. एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा तो तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करून ही कामगिरी केली. यापूर्वी हे यश कपिल देव आणि झहीर खान यांच्या नावावर होते. याशिवाय बुमराहने 2024 मध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. T20 विश्वचषकाच्या एकाच सीझनमध्ये 100 पेक्षा जास्त चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा 4.17 चा इकॉनॉमी रेट सर्वोत्तम आहे. या कामगिरीने त्याला टी-20 विश्वचषकात गोलंदाजीच्या बाबतीत आणखी एका मोठ्या स्थानावर नेले आहे.
अर्शदीप सिंग
अर्शदीप सिंगसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले गेले. अर्शदीप सिंगने T20 विश्वचषकाच्या एकाच सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. अफगाणिस्तानचे वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 17 बळी घेतले. अर्शदीपने 2024 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी अर्शदीपने 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13.5 च्या सरासरीने आणि 10.8 च्या स्ट्राइक रेटने 36 बळी घेतले आहेत.
रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विनने 2024 साली कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठला. अवघ्या 98 कसोटी सामन्यांमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे अश्विन सर्वात वेगवान 500 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करताना हा विशेष टप्पा गाठला.
रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजाने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या 73व्या कसोटी सामन्यात खालिद अहमदला बाद करून 300 बळींचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक धावा आणि 300 हून अधिक बळी घेणारा जडेजा आता जगातील केवळ 11 खेळाडूंपैकी एक बनला आहे. भारतात हा पराक्रम फक्त कपिल देव आणि आर अश्विननेच केला होता, ज्यामुळे जडेजाचा हा विक्रम आणखी खास बनला आहे.
रवी बिश्नोई
रवी बिश्नोईने 2024 साली T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्याची शानदार कामगिरी केली आहे. त्याने हा विक्रम 33 व्या डावात पूर्ण केला. यासह तो संयुक्तपणे भारताचा सर्वात वेगवान 50 बळी घेणारा दुसरा खेळाडू ठरला. बांगलादेशचा फलंदाज लिटन दासला बाद करून बिश्नोईने ही कामगिरी केली. याआधी अर्शदीप सिंगने 33 डावात 50 बळी घेण्याचा विक्रमही केला होता. त्याच वेळी, सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याचा विक्रम कुलदीप यादवच्या नावावर आहे, ज्याने केवळ 30 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.












Click it and Unblock the Notifications