Vaibhav Suryavanshi : 36 चेंडूत शतक! भारताचा दुसरा सर्वात वेगवान शतकवीर वैभव सूर्यवंशी कोण? वाचा
Who is Vaibhav Suryavanshi 14-Year-Old Who Hit 36-Ball Century : भारतीय क्रिकेट 'अ' संघाचा खेळाडू बिहारच्या वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. केवळ ३६ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या वादळी खेळीने पाकिस्तानच्या जहूर इलाहीचा ३९ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
'लिस्ट-A' क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरण्याचा बहुमान आता या 'बिहारी बाबू'ने आपल्या नावे केला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर लावलेली कोटींची बोली सार्थ ठरवत, वैभवने आपण भारतीय क्रिकेटचे 'फ्युचर सुपरस्टार' का आहोत, हेच पुन्हा एकदा सिद्ध केलं!

१. भारताचा दुसरा सर्वात वेगवान शतकवीर
बिहारच्या वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात केवळ ३६ चेंडूत शतक झळकावून खळबळ माजवली आहे. यासह तो 'लिस्ट-ए' (List-A) क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
२. अवघ्या एका चेंडूने हुकले अव्वल स्थान
भारताकडून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम पंजाबच्या अनमोलप्रीत सिंह याच्या नावावर आहे, ज्याने ३५ चेंडूत शतक ठोकले होते. वैभवने ३६ चेंडूत हा पराक्रम केल्याने, त्याचे भारताचा नंबर १ फलंदाज बनण्याचे स्वप्न अवघ्या एका चेंडूने हुकले.
३. दिग्गज फलंदाजांना टाकले मागे
३६ चेंडूत शतक झळकावत वैभवने भारताच्या मोठ्या विस्फोटक फलंदाजांना या यादीत मागे टाकले आहे. यामध्ये यूसुफ पठान (४० चेंडू), उर्विल पटेल (४१ चेंडू) आणि अभिषेक शर्मा (४२ चेंडू) यांचा समावेश आहे. यावरून वैभवच्या आक्रमक खेळीची प्रचिती येते.
४. जागतिक विक्रमाच्या रांगेत स्थान
जागतिक स्तरावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्क (२९ चेंडू) याच्या नावावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स (३१ चेंडू) आहे. वैभवने ३६ चेंडूत शतक करून जागतिक स्तरावरील या विस्फोटक फलंदाजांच्या क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
वैभव सूर्यवंशीला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' जाहीर
क्रीडा क्षेत्रातील असाधारण कामगिरी बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार ५ ते १८ वर्षे वयोगटातील अशा बालकांना दिला जातो ज्यांनी क्रीडा, कला, संस्कृती, शौर्य किंवा विज्ञान यांसारख्या क्षेत्रात असामान्य यश मिळवले आहे. वैभवने क्रिकेटच्या मैदानावरील आपल्या विलोभनीय कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
जन्म आणि गाव
वैभवचा जन्म २७ मार्च २०११ रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात झाला.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभुमी
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या मुलातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्याला पूर्ण पाठिंबा दिला. अगदी घराच्या मागेच पिच तयार करून सराव करून घेतला.
सर्वात तरुण रणजी खेळाडू
वयाच्या १२ व्या वर्षी बिहारसाठी रणजी ट्रॉफी खेळून त्याने आधुनिक क्रिकेटमधील सर्वात तरुण प्रथम श्रेणी खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
डावखुरा आक्रमक फलंदाज
वैभव हा एक आक्रमक डावखुरा फलंदाज असून त्याची तुलना अनेकदा युवा 'ऋषभ पंत'शी केली जाते.
आयपीएलमधील ऐतिहासिक एन्ट्री
मेगा लिलावात वैभव सर्वात तरुण खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर १.१० कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले. राजस्थान रॉयल्स ही टीम नेहमीच युवा टॅलेंटला (उदा. यशस्वी जैस्वाल) संधी देण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे वैभवच्या कारकिर्दीला इथून मोठी दिशा मिळण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications