प्रेमानंद महाराजांनी सांगितलं विराट कोहलीला अपयशाचं कारण; पहा दर्शनाचा VIDEO
नुकतंच सरलेलं वर्ष विराट कोहलीसाठी अपयशी ठरलं. या संपूर्ण वर्षात विराट कोहलीला आपली चमक दाखवता आली नाही. काही वेळा तो यशस्वी ठरला खरा, मात्र त्याला काही विशेष करता आलं नाही. आता आगामी काळात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने होणार आहेत. त्या सामन्यांपूर्वी विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्माने सहकुटुंब प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. या दर्शनप्रसंगी प्रेमानंद महाराजांनी विराटला त्याच्या अपयशाचं कारण सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

विराट आला दर्शनाला
विराट कोहलीचा फार्म सध्या गेल्याचे बोलले जात आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो धावा करणार का? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर- गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने शतक केलं. पण त्यानंतर त्याची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. त्याने आता निवृत्त व्हावं, अशी टीका सध्या सुरु आहे. या चर्चा सुरु असतानाच विराट कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला गेला. तिथे प्रेमानंद महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. तसेच काही प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकली.
Virat Kohli और Anushka Sharma की पूज्य महाराज जी से क्या वार्ता हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/WyKxChE8mC
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) January 10, 2025
काय म्हणाले प्रेमानंद महाराज
विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेला. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विराट कोहली आपल्या कुटुंबासह तिथे हात जोडून बसल्याचं दिसत आहे. प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहलीला विचारलं की, बरा आहेस ना.. तेव्हा कोहलीने आपलं डोकं हलवत हा असं उत्तर दिलं. प्रेमानंदजी महाराजांनी नंतर सांगितलं की, 'कोहली खेळाच्या माध्यमातून सेवा करत आहे आणि त्याला परमेश्वराकडून जे काही प्राप्त झालं आहे त्याच्या उच्चतम पातळीवर आहे. पण सरावात कोणतीच उणीव नसावी. पण प्रारब्ध असतात. काही अशुभ प्रारब्ध असले की अपयश मिळतं. पण सरावात कोणतीच कमतरता नसावी.'
महाराजांनी काय दिला सल्ला
प्रेमानंदजी महाराज म्हणाले, 'सराव पूर्ण असेल आणि प्रारब्धही पूर्ण असेल तर विजय निश्चित मिळतो. पण चांगला सराव करूनही कधी कधी प्रारब्धही आडवं येतं. त्यामुळे दु:ख भोगावं लागतं. अन्य लोकांच्या प्रभावामुळे चांगली कामगिरी करूनही अपयश मिळतं. कारण हा खेळ एकट्याचा नाही. त्यामुळे देवाचं नामस्मरण करून धीर ठेवावा लागेल. कठीण आहे पण अपयशात धीराने हसत पुढे निघून जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आता अपयश राहणार नाही. जर दिवस राहात नाही तर रात्र तरी कशी राहील.', असा धीर प्रेमानंदजी महाराजांनी विराट कोहलीला दिला.












Click it and Unblock the Notifications