विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? चर्चेने जोर धरला...
भारतीय संघाचा धावमशीन आणि आपल्या आक्रमक नेतृत्वाने संघाला नव्या उंचीवर नेणारा क्रिकेटपटू विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी संघात आपले स्थान डळमळीत होत असल्याचे लक्षात आल्याने विराटने हा अचानक निर्णय घेतल्याचे बोलले जात होते.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील नवख्या भारतीय संघाने इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर कसे तग धरावे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर गिलने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, लॉर्ड्स मैदानावर टीम इंडियाने हातातला सामना गमावल्यानंतर गिलच्या नेतृत्वाबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. मदन लाल यांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
लॉर्ड्समधील पराभवानंतर मदन लाल यांचे आवाहन
लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघ जिंकेल असे वाटत असतानाच फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ही गोष्ट मदन लाल यांच्या मनाला लागली आहे. त्यांनी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे अशी विनंती केली आहे. "निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही," असे ते म्हणाले. विराट कोहलीने पुन्हा भारतीय कसोटी संघात येऊन युवा खेळाडूंना त्याच्या अनुभवाचा फायदा करून दिला पाहिजे. तसेच खेळाप्रतीची निष्ठा काय असते, हे शिकवले पाहिजे, असे मदन लाल यांनी म्हटले आहे.
विराट अजूनही कसोटी खेळू शकतो: मदन लाल
विराट कोहलीची भारतीय क्रिकेटविषयी असलेली समर्पण वृत्ती अतुलनीय आहे. "त्याने भारतीय कसोटी संघात पुन्हा यावे, ही माझी इच्छा आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही," असे मदन लाल यांनी स्पष्ट केले. "त्याने इंग्लंडच्या सध्याच्या दौऱ्यातच भारतीय संघात यावे, असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्याने पुढील कसोटी मालिकेत भारतीय संघात यावे, असे मला वाटते.
विराट कोहली आणखी एक ते दोन वर्षे कसोटी क्रिकेट सहजपणे खेळू शकतो. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, हा माझा दृष्टिकोन आहे." अनुभवातून शिकलेल्या गोष्टी संघातील युवा खेळाडूंना सांगणे गरजेचे आहे, पण विराट अचानक कसोटी संघातून बाहेर पडला. "अजूनही उशीर झालेला नाही. कृपया परत ये," अशी विनंती मदन लाल यांनी विराटला केली आहे. आता यावर विराट कोहली आणि बीसीसीआय गांभीर्याने विचार करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications