T20 World Cup India vs Pakistan: भारत पाकिस्तान आज महामुकाबला
भारत पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांची लढत ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच. दोन्ही देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमी ला लढतीकडे लक्ष ठेऊन असतात. जिगर, थरार, उत्कंठा, हुरहूर असे सर्व भाव भारत पाक क्रिकेट सामन्यात पाहायला मिळतात. रविवारी रात्री न्यूयॉर्क येथे टी - २० विश्वचषक स्पर्धेत भारत पाक क्रिकेट सामना अनुभवता येणार आहे. या महामुकाबल्यासाठी बाबर सेना आणि रोहित सेना सज्ज झाली आहे.
हा सामना जिंकून आपली लय कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे, तर दुसरीकडे नवख्या अमेरिकेकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानचा सूर हरवला आहे. त्यामुळे हा संघ कमालीच्या दबावाखाली असणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाची धुरा रोहित शर्मा सांभाळणार असून पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार हा मुकाबला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

हा सामना न्यूयॉर्क येथील नसाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. ३४ हजार प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान आहे. या मैदानाची खेळपट्टी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. एप्रिलमध्ये या खेळपट्टीवर चार ड्रोप इन खेळपट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. जी अजून स्थिर झालेली नाहीत. या खेळपट्टीवर चेंडू कमालीची उसळी घेतो, त्यामुळे फलंदाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मैदानावर अजूनपर्यंत पाकिस्तानचा सामना झालेला नाही. अमेरिकेकडून पराभूत झालेला पाकिस्तानचा संघ गुरुवारीच येथे दाखल झाला आहे.
५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिलेले आहे. अनेक रोमहर्षक सामने रसिकांनी अनुभवले आहेत. १९९२ साली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. १९९६ साली उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची गाठ पडली होती. तेव्हाही भारताने पाकला पराभूत केले होते.
टी ट्वेंटी स्पर्धेतही भारताचे पारडे नेहमीच जड राहिलेले आहे. टी ट्वेंटी स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्या एकूण १२ सामने झाले आहेत. त्यापैकी 8 सामने भारताने जिंकले आहेत तर ३ सामने जिंकण्यात पाकिस्तानला यश आले आहे. १ सामना टाय झाला त्यातही बॉल आउट फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
त्रयस्थ ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण ९ वेळा आमना सामना झाला आहे. त्यापैकी ६ सामने जिंकण्यात भारत यशस्वी ठरला आहे तर २ वेळा पाकिस्तानने भारताला मात दिली आहे. १ सामना टाय झाला, त्यातही बॉल आउट फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानची आतापर्यंत ७ वेळा टक्कर झाली आहे, त्यापैकी 5 सामने भारताने जिंकले आहेत तर १ वेळा पाकिस्तानने भारताला पराभूत केले आहे. १ सामना टाय झाला, त्यातही बॉल आउट फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.












Click it and Unblock the Notifications