T-20 World Cup 2026 : सेमीफायनलचे काऊंटडाऊन सुरू! WIला नमवल्यानंतर इंडियासमोर 'हे' तगडे आव्हान
ICC Men's T20 World Cup semifinal scenario : टी-20 विश्वचषक 2026चा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून सुपर-8 फेरीतील लढतींनी क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकावला आहे.
स्पर्धेतील 'अंतिम चार' संघांचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. गतविजेता इंग्लंड आणि फॉर्मात असलेला दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी आधीच आपापल्या गटात वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीत (Semi-finals) दिमाखात प्रवेश केला आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय संघाच्या कामगिरीकडे लागले आहे.

भारतासाठी 'करो या मरो'ची लढाई
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ७२ धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान अद्याप जिवंत आहे. मात्र, उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला आता एका मोठ्या अडथळ्याचा पार करावा लागणार आहे.
- सामना: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
- तारीख: रविवार, १ मार्च २०२६
- ठिकाण: ईडन गार्डन्स, कोलकाता
भारतासाठी ही लढत 'करो या मरो' अशी आहे. जर भारताने या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर टीम इंडिया थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यास भारतीय संघाचे विश्वचषकातील स्वप्न अधुरे राहील आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.
सेमीफायनलचे समीकरण: भारताचा सामना कोणाशी?
गट-१ मध्ये दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. जर भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, तर भारत या गटात दुसऱ्या क्रमांकावर राहील. आयसीसीच्या नियमांनुसार, गट-१ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचा सामना गट-२ मधील अव्वल क्रमांकाच्या संघाशी होतो.
गट-२ मध्ये इंग्लंडने अव्वल स्थान काबीज केले आहे. म्हणजेच, वेस्ट इंडिजला हरवल्यानंतर भारताला फायनल गाठण्यासाठी बलाढ्य इंग्लंडचा सामना करावा लागेल. दुसरीकडे, गट-२ मध्ये दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. पाकिस्तानला पात्र ठरण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य आहे, अन्यथा न्यूझीलंडचा मार्ग मोकळा होईल.












Click it and Unblock the Notifications