शुभमन गिलचा पत्ता कट करण्यात गौतम गंभीर अन् आगरकरांचा मोठा हात; लखनऊमध्ये कसा आखला प्लॅन?
Shubman Gill Dropped from T20 WC 2026 : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकाच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली आहे. ती म्हणजे शुभमन गिल. 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी नुकताच भारतीय संघ जाहीर केला.
मात्र, या संघातून एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार असलेल्या शुभमन गिलचे नाव गायब असल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामागे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

लखनौच्या बंद दाराआड झाले 'ते' नियोजन
मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला संघातून बाहेर करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेदरम्यान यावर शिक्कामोर्तब झाले.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी लखनौमध्ये टी-20 सामना होणार होता, पण प्रदूषणाने तो रद्द झाला, त्याच दिवशी टीम इंडियाच्या भविष्यातील वाटचालीवर महत्त्वाची चर्चा झाली.
NDTVने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात लखनौमध्ये एक बैठक झाली.
याच बैठकीत गिलला टी-२० संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे इतका मोठा निर्णय घेऊनही गिलला याबद्दल पुसटशी कल्पनाही देण्यात आली नव्हती.
संवादाचा अभाव आणि 'प्रिन्स'ची उपेक्षा!
भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा मोठा खेळाडू संघातून बाहेर केला जातो, तेव्हा सहसा त्याला त्याबद्दल कळवले जाते. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या काळात ही प्रथा पाळली जात होती.
अगदी दिलीप वेंगसरकर निवड समितीचे अध्यक्ष असतानाही खेळाडूंना विश्वासात घेतले जायचे. पण गिलच्या बाबतीत असे काहीही घडले नसल्याचे समोर आले आहे. गिलला संघातून डच्चू देण्यापूर्वी त्याची मते जाणून घेण्यात आली नाहीत. संघ निवडीपूर्वी व्यवस्थापनाने गिलशी कोणताही संवाद साधला नाही. अधिकृत घोषणा होईपर्यंत 'प्रिन्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिलला त्याच्या भवितव्याबद्दल अंधारात ठेवण्यात आले.
दुखापत आणि खराब फॉर्म ठरला निमित्त?
शुभमन गिलला वगळण्यामागे व्यवस्थापनाने त्याचे फॉर्म आणि तंदुरुस्ती ही कारणे पुढे केली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत गिलला पायाची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला, जो गौतम गंभीर आणि आगरकर यांच्या प्लॅनिंगसाठी एक मजबूत मुद्दा ठरला.
दुसरीकडे, गिल अहमदाबादमध्ये होणारा पाचवा टी-२० सामना खेळण्यासाठी उत्सुक होता. त्याने आपली उपलब्धता दर्शवूनही व्यवस्थापनाने त्याला संधी न देता, पर्यायांचा विचार करणे अधिक योग्य मानले.
सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद कायम!
एकीकडे गिलला बाहेरचा रस्ता दाखवला जात असताना, दुसरीकडे सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म असूनही त्याचे कर्णधारपद सुरक्षित ठेवण्यात आले आहे. आगामी विश्वचषकापर्यंत संघात कोणताही मोठा बदल करण्याची रिस्क व्यवस्थापन घेऊ इच्छित नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.
निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत गिलला वगळण्याचे ठोस कारण दिले नाही, ज्यामुळे संशयाची पाल अधिकच चुकचुकत आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संघातून काढले जाते, तेव्हा ते केवळ खेळाडूच्या कामगिरीवर नाही, तर निवड समितीच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करते.












Click it and Unblock the Notifications