"मी थरथर कापत होते!" शोएबसोबतच्या 'त्या' गोष्टीनंतर सानिया मिर्झाला पॅनिक अटॅक! कुणी केली मदत? वाचा
Sania Mirza Reveals Post Divorce Panic Attack : आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर भारताचे नाव अभिमानाने उंचावणारी, क्रीडा जगतातील दिग्गज आणि माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत भावनिक आणि कठीण क्षणाचा खुलासा केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतरच्या तिच्या संघर्षावर सानियाने पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
नुकत्याच लाँच झालेल्या तिच्या 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' या टॉक शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये तिने 'पॅनिक अटॅक' आणि बॉलिवूडची प्रसिद्ध डायरेक्टर व तिची खास मैत्रीण फराह खान हिच्या मदतीची कहाणी सांगितली.

सानिया मिर्झा कोण आहे?
सानिया मिर्झा ही भारताची एक अत्यंत यशस्वी टेनिसपटू आहे. तिने डबल्स प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. तिला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न (आताचा मेजर ध्यानचंद खेल रत्न) यांसारख्या सर्वोच्च नागरी आणि क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
थरथरत्या देहाने लाईव्ह शो... जेव्हा फराह धावून आली
सानियाने तिच्या टॉक शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पहिली पाहुणी म्हणून आलेल्या फराह खानसोबत 'त्या' दिवसाची आठवण सांगितली, जो तिच्यासाठी अत्यंत निराशाजनक होता. सानियाच्या भावना काय होत्या हे तिच्याच शब्दात..
"मला त्या क्षणाची आठवण आहे... मी कॅमेऱ्यावर याबद्दल बोलू इच्छित नाही, पण घटस्फोटानंतरचा तो काळ माझ्यासाठी प्रचंड तणावपूर्ण होता. एक दिवस मला लाईव्ह शोमध्ये जायचे होते, पण त्याआधी माझ्या सेटवर तुम्ही (फराह खान) आलात. तुमच्या येण्याने मला खूप आधार मिळाला, कारण त्या वेळी मी अक्षरश: थरथर कापत होते. माझ्या शरीरात ऊर्जा नव्हती आणि मला प्रचंड पॅनिक अटॅक आला होता.
मी फराहला स्पष्टपणे सांगितले, 'जर तुम्ही इथे आला नसती, तर मी तो शो केला नसता.' तुम्ही मला धीर दिला आणि ठामपणे सांगितले की, 'काहीही झाले तरी, तू हा शो करत आहेस आणि तू ही परिस्थिती हाताळू शकतेस.' तुमच्या त्या शब्दांमुळेच मी स्वत:ला सावरू शकले."
फराह खानने सांगितली त्या दिवसाची आठवण
फराह खाननेही त्या दिवसाची आठवण सांगितली. "मी सानियाला इतकी अस्वस्थ पाहून खूप घाबरले होते. मला तेव्हा दुसरे एक शूट होते, पण मी ते सगळे सोडून, साध्या पायजमा आणि चप्पलमध्ये तिच्याजवळ धावले. मला फक्त माझ्या मैत्रिणीसोबत राहायचे होते," असे फराहने सांगितले. या हृदयस्पर्शी खुलाशातून घटस्फोटानंतरच्या मानसिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी सानियाला तिच्या जिवलग मैत्रिणीच्या मदतीने किती मोठा आधार मिळाला, हे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications