इंग्लंड कसोटीतून ऋषभ पंत बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठा धक्का बसला आहे. भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. डॉक्टरांनी त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडावे लागले होते.

दुखापत कशी झाली?
क्रिस वोक्सच्या एका चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली. सामन्याच्या 68 व्या षटकात हा प्रसंग घडला. ख्रिस वोक्सचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारताना पंतच्या उजव्या बुटावर थेट आदळला. चेंडू लागल्याने त्याच्या पायातून रक्त येऊ लागले आणि काही वेळातच सूजही दिसू लागली. त्याला उभे राहणे किंवा चालणे कठीण झाल्याने त्वरित रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टरांनी त्याला किमान सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
पंतच्या जागी ईशान किशनला संधी?
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशन सध्या चांगली फॉर्ममध्ये आहे आणि तो पंतची उणीव भरून काढू शकेल अशी अपेक्षा आहे.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा संक्षिप्त आढावा
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. केएल राहुल 46 धावांवर, तर यशस्वी जयस्वाल 58 धावांवर बाद झाले. शुभमन गिलला (12 धावा) बेन स्टोक्सने बाद केले. संघात परतलेल्या साई सुदर्शनने 61 धावांचे योगदान दिले. दुखापतीमुळे ऋषभ पंत 'रिटायर्ड हर्ट' झाला. दिवसाच्या अखेरीस रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी 19 धावांवर खेळत होते.












Click it and Unblock the Notifications