सर रवींद्र जडेजावर कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले हा कर्णधार...
लॉर्ड्स कसोटीत (Lord's Test) भारत २२ धावांनी हरला असला, तरी या सामन्यात एका खेळाडूने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाच्या आशा कायम ठेवल्या. सर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने नाबाद ६१ धावांची खेळी करत विजयासाठी एक मोठी लढत दिली. पाचव्या दिवसाच्या सकाळी एकमागून एक भारतीय फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, जडेजा मात्र मैदानावर डटून राहिला. त्याने ६१ धावांची झुंजार खेळी केली.

भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. आधी पंत (Pant), नंतर राहुल (Rahul) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) लवकर बाद झाले. संघाची धावसंख्या १०० पर्यंत पोहोचण्याआधीच सात गडी बाद झाले होते. पण जडेजा एका टोकाला स्थिर राहिला. त्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर संयम आणि तंत्र दाखवले. मात्र, संघ विजयापासून केवळ २२ धावा दूर असताना मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपली विकेट गमावली.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
जडेजाच्या ६१ धावांच्या खेळीत आठ चौकार आणि एक शानदार षटकार समाविष्ट होता. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत छोट्या-छोट्या भागीदारी केल्या आणि संघाला १७० धावांपर्यंत पोहोचवले. सोशल मीडियावर जडेजाच्या या झुंजार फलंदाजीचे जोरदार कौतुक होत आहे. एका चाहत्याने लिहिले की, 'जडेजा एकटाच लढत राहिला, बाकीच्यांनी शस्त्रे टाकली.' दुसऱ्याने लिहिले की, 'हा जडेजाचा संघ असायला हवा होता, तोच कर्णधार असायला हवा.'
भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर
पंत, राहुल आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांसारखे अनुभवी फलंदाज अपयशी ठरले असताना, जडेजाने मात्र आपला दर्जा दाखवला. त्याच्या फलंदाजीमध्ये आत्मविश्वास, अनुभव आणि धैर्य तिन्ही दिसून आले. हा सामना भारताच्या हातून निसटला असला तरी, जडेजाची ही खेळी क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम स्मरणात राहील. या पराभवासह भारत आता मालिकेत २-१ ने पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना भारतासाठी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.












Click it and Unblock the Notifications