मोठी बातमी : आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान बाहेर; या दोन देशांना मिळणार संधी
Asia Cup Hockey 2025 : आशिया कप हॉकी स्पर्धेची सुरूवात होण्याआधीच एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तानने अधिकृतपणे माघार घेतली आहे.
पाकिस्तान सोबतच ओमानने देखील स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, आता बांगलादेश आणि कझाकस्तानला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
हॉकी इंडियाशी निगडीत सूत्रांनी काही माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) भारतात येण्यास नकार दिला आहे.
ओमानचा संघही माघार घेत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानचा ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला आहे. या बातमीमुळे हॉकीप्रेमींमध्ये काही प्रमाणात निराशा पसरली आहे. कारण, त्यांना भारत पाकिस्तान यांच्यातील सामना पाहता येणार नाही.

सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानची माघार
गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अशा बातम्या येत होत्या की पाकिस्तान या स्पर्धेतून माघार घेऊ शकतो. एक महिन्यापूर्वीच पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) भारतात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता.
विशेष म्हणजे, भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याची तयारी दर्शवली होती. तरीही, PHF ने भारतात येण्यास नकार दिला. PHF ने या स्पर्धेचे ठिकाण भारतातून इतरत्र हलवण्याचाही सल्ला दिला होता, पण आयोजकांनी ही मागणी फेटाळली.
भारत सरकारने दिली होती सुरक्षेची हमी
ही स्पर्धा 2026 च्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला वगळणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरेल. भारत सरकारने सुरक्षा आणि व्हिसा दोन्हीची हमी दिल्याने पाकिस्तानच्या या हट्टीपणावर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
परंतु तरीही पाकिस्तानची भूमिका बदलली नाही. अलिकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईनंतर पाकिस्तानचा हा राग आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईद्वारे भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला.
आशिया कपचा इतिहास
आशिया कप हॉकीची सुरुवात 1982 मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे झाली होती. तेव्हापासून ही स्पर्धा आशियाई हॉकीमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते.
त्याच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ दक्षिण कोरिया आहे, ज्याने पाच वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेतून पाकिस्तानच्या माघारीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांचा खेळावर कसा परिणाम होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामुळे खेळाला राजकारणापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.












Click it and Unblock the Notifications