T20 world cup 2024 : पहिल्या सामन्यापासून ते विश्वविजेत्यापर्यंतचा भारताचा असा राहिला प्रवास
T20 world cup 2024 : टी २० विश्वचषक स्पर्धेचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक थरारक सामना असावा. अब्बास मस्तानचा चित्रपट पाहावा तशी अनुभूती अंतिम सामना पाहताना आली. क्षणाक्षणाला इकडे तिकडे झुकणारे पारडे, क्षणात जल्लोष तर क्षणात स्मशानशांतता, काळजाचे वाढलेले ठोके, विस्फारलेले डोळे, देवाचा धावा आणि अखेरीस दिमाखाने आणि जल्लोषात फडकणारा तिरंगा.

जगभरात भारतीयांकडून साजरी झालेली दिवाळी आणि जल्लोष. सोशल मिडीयावर ओसंडून वाहणारा अभिनंदनाचा पूर आणि भारलेले वातावरण. तब्बल १७ वर्षांनी भारताचा कर्णधार क्रिकेटचा विश्वचषक उंचावून धरीत होता. ४० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत अत्यंत सभ्य गृहस्थ म्हणून ओळख निर्माण केलेला प्रशिक्षक राहुल द्रविड बेभान होऊन जल्लोष करीत होता.एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातल्या पराभवाची जखम भरून निघाली होती. सेलिब्रेशन तो बनता है .
अभिमानास्पद संघ, अभिमानास्पद वाटचाल
राहुल द्रविड सारखा संयमी आणि शांत स्वभावाचा जंटलमन प्रशिक्षक, हिटमॅन रोहित शर्मासारखा कप्तान, विराट कोहलीसारखा सदाबहार फलंदाज, ऋषभ पंत, सुर्याकुमार यादव, अक्षर पटेल , शिवं दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अर्शादीप सिंग, कुलदीप यादव आणि जगातला सध्याचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह अशी तगडी फौज असलेला भारतीय संघ.
कोणत्याही क्षणी कोणताही कोणताही खेळाडू चमत्कार घडवेल आणि सामना एकहाती जिंकून देईल अशी परिस्थिती. आणि या अशा बलाढ्य संघाने आपला लौकिक राखला. सुरुवातीच्या सामन्यापासून अपराजित राहण्याची परंपरा राखली. स्वतःप्रमाणेच पहिल्या सामन्यापासून अपराजित असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात धूळ चारली आणि ख-या अर्थाने आपण अजिंक्य आहोत, अभेद्य आहोत, खरे जगज्जेते आहोत हे दाखवून दिलं.
मिशन वर्ल्ड कपचा लखलखता प्रारंभ
अमेरिकेत झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेची सुरुवातच भारताने दमदार केली.वर्म अप सामन्यात भारताने बांगलादेशला ६० धावांनी धूळ चारली.५३ धावा करणारा ऋषभ पंत, सुर्याकुमार यादव (३१) आणि हार्दिक पंड्या (४० ) यांनी भारताला १८२ धावा जमवण्यात यश मिळवून दिले. भारतीय गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले. हार्दिक पंड्या वगळता सर्वच गोलंदाजांनी 4-5 च्या सरासरीने गोलंदाजी केली. त्यामुळे बांगलादेशचा संघ निर्धारित २० शतकांत अवघ्या फक्त १२२ धावा जमवू शकला आणि भारताने आपली विजय मोहीम सुरु केली.
आयर्लंडला अक्षरशः चिरडले
विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्या सामन्यात भारताची गाठ पडली ती आयर्लंडशी. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शब्दशः आग ओकली. भारतीय तोफखान्यासमोर एकही आयरिश फलंदाज धड उभा राहू शकला नाही. आणि आयर्लंडचा 16 षटकांत अवघ्या ९६ धावांत खुर्दा उडाला. हार्दिक पंड्या याने 27 धावांत ३ तर अर्शादीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मोहम्मद सिराजने १ मोहरा टिपला. प्रत्युत्तरात रोहित शर्माने अवघ्या ३७ चेंडूत ५२ धावा कुटल्या आणि ऋषभ पंतने २६ चेंडूत ३६ धावा केल्या. २ गड्यांच्या मोबदल्यात भारताने ९६ धावा पूर्ण केल्या तेव्हा ४६ चेंडू शिल्लक होते.जसप्रीत बुम्राने सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.
पारंपारिक प्रतिस्पर्ध्याशी कांटे की टक्कर
भारत पाकिस्तान सामना म्हणजे थरार. जगभरातील क्रिकेट रसिक या सामन्याची आतुरतेने वाट पाहतात. टी २० विश्वचषक स्पर्धेत देखील भारताची पाकिस्तानशी गाठ पडली आणि नेहमीप्रमाणे हा सामना थरारक झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा जमविल्या. त्यात ऋषभ पंत(४२) आणि अक्षर पटेल (२०) यांनीच समाधानकारक खेळ केला. बाकीचे फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर ढेपाळले.
नसीम शह आणि हरीस रौफ हे पाकिस्तानी गोलंदाज भारताचे कर्दनकाळ ठरले. दोघांनीही प्रत्येकी ३ गडी बाद केले. ६ पेक्षाही कमी रनरेट असलेला हा सामना जिंकणे अशक्य होते मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ गडी बाद केले. त्याला बाकीच्या गोलंदाजांनी चांगली साथ दिली. भारताच्या भेदक मार्यासमोर पाकिस्तानने नांगी टाकली आणि पाकचा डाव ११३ धावांत संपुष्टात आला. भारताने पारंपारिक प्रतिस्पर्ध्याला अवघ्या ७ धावांनी धूळ चारली होती. जसप्रीत बुमराहला सामनावीर किताब मिळाला.
अमेरिकेशी संघर्ष आणि कॅनडा अनिर्णीत
नवख्या अमेरिकेवर विजय मिळवताना भारताला काहीसा संघर्ष करावा लागला. स्टीव्ह टेलर (२४) आणि नितीश कुमार (27) यांच्या जोरावर अमेरिकेने ११० धावा जमविल्या. अर्शादीप सिंगने अवघ्या ९ धावांत 4 गडी गारद केले. प्रत्युत्तरात खेळताना रोहित शर्मा (३) आणि विराट कोहली (०) हे अत्यंत स्वस्तात बाद झाले. मात्र ऋषभ पंत (१८) आणि सुर्याकुमार यादव (५०) यांनी भारताचा डाव सावरला. भारताने १८ षटकांत १११ धावा जमवून अमेरिकेला ७ गड्यांनी पराभूत केले. अर्शादीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. कॅनडा विरुद्धचा भारताचा सामना होऊ शकला नाही.
सुपर 8 मध्ये दिमाखदार सुरुवात
सुपर 8 फेरीत रुबाबात दाखल झालेल्या भारतीय संघाने या फेरीत देखील प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने १८१ धावांचा डोंगर उभा केला. त्यात सुर्याकुमार यादव यांने ५३ धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याने ३२ धावा करून त्याला चांगली साथ दिली. अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांत ढेपाळला. अर्शादीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
सुर्याकुमार यादव हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसर्या सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताने १९६ धावांचे खडतर आव्हान दिले होते. हार्दिक पंड्याने अर्धशतक साजरे केले, त्याला रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशने चांगला खेळ केला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या कसदार मार्यासमोर बांगलादेशी फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि त्यांचा संघ १४६ धावांत गारद झाला. हार्दिक पंड्या सामनावीर ठरला.
ऑस्ट्रेलियाचे उट्टे काढले
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. ती सल भारताच्या मनात होती. सुपर 8 मध्ये भारताने तो हिशोब चुकता केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने तब्बल २०५ धावा केल्या. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर तुटून पडले.
कप्तान रोहित शर्माने धुवाधार खेळी करताना ४१ चेंडूत ९२ धावांची लयलूट केली. त्यात 8 षटकार आणि ७ चौकार होते. त्याला सुर्याकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. ट्रेव्हीस हेड खेळत असताना भारताला धाकधूक वाटत होती. तो ७६ धावांवर बाद झाला आणि विजय सोपा झाला. ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. रोहित शर्मा सामनावीर ठरला.
उपांत्य लढतीत साहेबावर मात
उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७१ धावा जमविल्या. रोहित शर्माने कप्तानाला साजेशी खेळी करताना ५७ धावा केल्या. सुर्याकुमार यादवने ४७ धावा करून त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १०३ धावांत गडगडला. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले. आणि अशा पद्धतीने साखळी तसेच सुपर 8 फेरीतील सर्व सामने जिंकून आणि उपांत्य सामना आरामात खिशात घालून भारत अंतिम फेरीत आला.
शेवट गोड ते सारेच गोड
पहिल्या सामन्यापासून जगजेत्याच्या थाटात असलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात देखील आपला तोरा कायम ठेवला. विराट कोहलीच्या झंझावाती ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने चिवट झुंज दिली. सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला बदलत होते. ३० चेंडूत ३० धावा असे समीकरण निर्माण झाले आणि भारताची धाकधूक वाढली. पण सुर्याकुमार यादवने मिलरचा अशक्यप्राय झेल टिपला आणि सामन्याचे पारडे क्षणात फिरले.
आफ्रिकेचा डाव १६९ धावांत संपला. ७ धावांनी भारत जगज्जेता ठरला. चोकर्स हे आफ्रिकेला चिकटलेले बिरूद कायम राहिले. गेल्या सहा महिन्यात पंड्याला झालेल्या बदनामीच्या जखमा भरून निघाल्या.सभ्यतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडच्या हातात विश्वचषक विसावला. कोट्यावधी भारतीय एकदिवसीय विश्वचषकाच्या जखमा विसरून गेले. जल्लोष सुरु झाला. हो ... शेवट गोड झाला. भारत जगज्जेता झाला.












Click it and Unblock the Notifications