गौतम गंभीरची सुट्टी होणार? बीसीसीआयच्या मोठ्या हालचाली; टेस्ट कोच बदलण्याच्या तयारीत बोर्ड!
Gautam Gambhir :भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळातील टीम इंडियाची खराब कामगिरी आणि गंभीरच्या रणनीतीवर उठणारे प्रश्नचिन्ह यामुळे बीसीसीआय (BCCI) आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, गंभीरला कसोटी क्रिकेटच्या प्रशिक्षक पदावरून हटवून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबत बोर्ड विचार करत आहे. यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

गंभीरचे कसोटी प्रशिक्षक पद धोक्यात?
पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय गौतम गंभीरला केवळ मर्यादित षटकांच्या (T20 आणि वनडे) प्रशिक्षक पदापर्यंत मर्यादित ठेवण्याचा विचार करत आहे. कसोटी क्रिकेटसाठी वेगळा प्रशिक्षक नियुक्त करण्याची बोर्डाची योजना असल्याचे समजते. मात्र, गंभीरला बोर्डातील काही बड्या नेत्यांचा भक्कम पाठिंबा असल्याने हा निर्णय इतका सोपा नसेल.
गंभीरच्या बाजूने आणि विरोधात काय?
टी-२० वर्ल्ड कपचा कस: जर भारतीय संघ २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला किंवा किमान फायनलपर्यंत पोहोचला, तर गंभीरचे स्थान टिकून राहू शकते.
सध्या रेड बॉल (कसोटी) क्रिकेटसाठी सक्षम पर्यायांची कमतरता आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांना या पदासाठी विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तूर्तास गंभीरकडेच ही धुरा राहू शकते. तर दुसरीकडे कसोटी सामन्यांमधील भारताची ढासळती कामगिरी गंभीरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
आगामी न्यूझीलंड मालिका महत्त्वाची
भारतीय संघ ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहे. यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामने होणार आहेत. या मालिकेनंतर भारत टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागेल. या मालिकेतील कामगिरी गंभीरच्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
गौतम गंभीरचा करार साडेतीन वर्षांसाठी
- बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ९ जुलै २०२४ रोजी गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
- प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली मालिका श्रीलंका दौरा (जुलै-ऑगस्ट २०२४) ही होती. या दौऱ्यात भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली, तर वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला होता.
- गौतम गंभीर यांचा करार ३.५ वर्षांसाठी म्हणजेच जुलै २०२४ पासून डिसेंबर २०२७ पर्यंत (पुढील वनडे वर्ल्ड कपपर्यंत) करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications