IPL 2025 : पाकिस्तानी खेळाडू IPL का खेळत नाही? काय आहे कारण घ्या जाणून
IPL 2025 : भारत - पाकिस्तान हा सामना नेहमी हायहोल्टेज असतो. या सामन्यांत भारताने आजवर आपला वरचष्मा दाखवलेला आहे. इतकेच नाही तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही भारताची पाकिस्ताविरुद्ध दमदार कामगिरी आहे. प्रश्न हा आहे की, क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, पण पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाही, अनेकांना हा विषय माहीत नाही.
आज आपण पाकिस्तान आयपीएलमध्ये का खेळत नाही, पाकिस्तानी खेळाडूवर भारतात खेळण्यास बंदी आहे का कि अजून काही कारण आहे हे जाणून घेणार आहोत.

कधी झाली आयपीएल सुरु
आयपीएल ही जगात सर्वात जलदरित्या लोकप्रीय झालेली लीग आहे. भारतात तर आयपीएल सीरीज म्हटले तर उत्सवाचेच दिवस असतात. हे आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग 2008 साली सुरू झाली। यामध्ये भारत आणि परदेशातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी भाग घेतला. आता, 17 हंगाम खेळल्यानंतर, IPL जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा लीग बनली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी इटालियन खेळाडूंनीही नोंदणी केली होती हे विशेष.. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच नाही तर बांगलादेशचेही खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकतात, पण पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळू शकत नाही.
पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये का खेळत नाहीत?
आयपीएलचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. आयपीएल ऑक्शन (लिलाव) प्रक्रियाही झाली. त्यानंतर संघही ठरले, कोणता खेळाडू कोणत्या संघात खळणार हेही निश्चित झाले आहे पण पाकिस्तानी खेळाडूंना गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये येण्यास भारताने मज्जाव केला आहे.
2008 मध्ये आयपीएल 18 एप्रिल ते 1 जून दरम्यान खेळला गेला, जिथे राजस्थान रॉयल्सने अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा 3 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. पहिल्या सीझननंतर अवघ्या काही महिन्यांतच मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. तो दिवस 26 नोव्हेंबरचा होता. मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर शहर हादरले होते. या हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबने जेव्हा सांगितले की, हल्ल्यांची योजना पाकिस्तानात होती. त्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली होती.
मुंबई हल्ल्यानंतर राजनैतिक संबंध बिघडले
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले. यामुळेच आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही दोन्ही देश आमनेसामने आहेत. भारत सरकारने आपला क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेतून माघार घेण्याची आणि भविष्यात भारतासोबत कोणताही सामना न खेळण्याची धमकी दिली आहे. दरम्यान यावर तोडगा म्हणून भारतीय संघाचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत होत आहेत.
...तेव्हापासून द्विपक्षिय मालिका खेळली गेली नाही
मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडल्याचा क्रिकेटवर मोठा परिणाम झाला. 2012-13 च्या मालिकेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. आयपीएल 2008 आठवले तर एकूण 11 पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. त्यात शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी, सोहेल तन्वीर आणि मोहम्मद आसिफ हे आघाडीचे खेळाडू होते.












Click it and Unblock the Notifications