India Vs Pakistan: 'दुहेरी' धमाक्यासाठी सज्ज व्हा! T-20 विश्वचषकात रंगणार हाय-व्होल्टेज सामने
India vs Pakistan T20 World Cup 2026 : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान! आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. T-20 विश्वचषक 2026 मध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी केवळ एकदाच नाही, तर किमान दोन आणि जास्तीत जास्त तीन वेळा आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकारने विश्वचषकावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्याने या महामुकाबल्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पहिली लढत : 15 फेब्रुवारीला 'रविवारअस्त्र'
T-20 विश्वचषक २०२६ च्या अधिकृत वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 'गट अ' मध्ये आहेत. या दोन्ही संघांमधील गट साखळीतील पहिला थरार रविवार, १५ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.
या सामन्याची अधिकृत घोषणा झाल्यापासून दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर या सामन्यावर शिक्कामोर्तब झाल्याने क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दुसरी लढत : सुपर-8 टप्प्यात पुन्हा गाठ पडणार?
पहिल्या सामन्यानंतरही भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. यासाठीची समीकरणे खालीलप्रमाणे आहेत:
समान गट : जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापल्या गटात पहिल्या दोन स्थानांवर झेप घेतली, तर ते सुपर-८ टप्प्यासाठी पात्र ठरतील.
सीडिंगचा खेळ : सहसा आयसीसी पहिल्या फेरीतील सामन्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संघांना वेगवेगळ्या गटात ठेवते. मात्र, जर स्पर्धेदरम्यान गुणांच्या गणितात उलटफेर झाला किंवा सीडिंगच्या बदललेल्या नियमांनुसार दोन्ही संघ एकाच सुपर-८ गटात आले, तर चाहत्यांना बाद फेरीपूर्वीच आणखी एक 'महायुद्ध' पाहायला मिळू शकते.
महत्त्वाची नोंद : स्पर्धेच्या सध्याच्या स्वरूपानुसार, जर दोन्ही संघांची कामगिरी सरस राहिली, तर ते किमान दोनदा एकमेकांसमोर येतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तिसरी लढत: सेमीफायनल किंवा फायनलचा थरार
जर नशिबाने आणि खेळाने साथ दिली, तर भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदाही एकमेकांशी भिडू शकतात.
सेमीफायनल : जर दोन्ही संघ वेगवेगळ्या सुपर-८ गटात असतील आणि आपापल्या गटातून पात्र ठरले, तर त्यांची गाठ उपांत्य फेरीत (Semi-final) पडू शकते.
फायनल (अंतिम सामना) : सर्वात मोठे स्वप्नवत समीकरण म्हणजे जर हे दोन्ही संघ एकाच सुपर-८ गटातून अव्वलस्थानी आले आणि त्यांनी आपापले उपांत्य सामने जिंकले, तर थेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने असतील. जर असे झाले, तर हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरेल.
समीकरणानुसार 'हॅट्ट्रिक'ची संधी
गणिताच्या भाषेत सांगायचे तर, या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त 3 सामने होऊ शकतात.
- गट टप्पा (निश्चित: १५ फेब्रुवारी)
- सुपर-८ टप्पा (संभाव्य)
- बाद फेरी (उपांत्य किंवा अंतिम सामना)












Click it and Unblock the Notifications