वानखेडेवर टीम इंडियाचा धमाका! इंग्लंडचा पराभव करत भारत चौथ्यांदा T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला
IND vs ENG semi final highlights : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत दिमाखात T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने अंतिम फेरीत पोहोचण्याची ही चौथी वेळ (2007, 2014, 2024 आणि आता 2026) आहे.

संजू सॅमसनची वादळी फलंदाजी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने २० षटकांत ७ गडी गमावून २५३ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या धावसंख्येचा कणा ठरला तो संजू सॅमसन. संजूने केवळ ५० चेंडूत ८९ धावांची स्फोटक खेळी करत इंग्लिश गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याच्या या खेळीमुळे भारताला अडीचशे पार मजल मारता आली.
A #T20WorldCup classic in Mumbai as India beat England in a nail-biter to reach the Final 🔥
— ICC (@ICC) March 5, 2026
📝: https://t.co/w7G9C2FaMw pic.twitter.com/kazCgeeHDs
जेकब बेथेलचे शतक व्यर्थ
२५४ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली, मात्र तरुण फलंदाज जेकब बेथेलने मैदानाचा ताबा घेतला.
बेथेलने अवघ्या ४८ चेंडूत १०५ धावांची झंझावाती शतकी खेळी करत भारतीय गोटात घबराट निर्माण केली होती. बेथेल जोपर्यंत मैदानात होता, तोपर्यंत इंग्लंड विजयाच्या जवळ वाटत होते. मात्र, मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी संयम राखला आणि इंग्लंडला २० षटकांत ७ बाद २४६ धावांवर रोखले.
रोमांचक शेवट आणि भारताचा ऐतिहासिक विजय
हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात मोठी धावसंख्या हवी होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बेथेलचे शतक व्यर्थ ठरवले.
भारताने यापूर्वी २००७ मध्ये जेतेपद पटकावले होते, तर २०१४ आणि २०२४ मध्येही अंतिम फेरी गाठली होती. आता चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला हा 'मेन इन ब्लू' संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.












Click it and Unblock the Notifications