आतच राहा...अजिबात बाहेर पडू नका, टीम इंडियाला अचानक हॉटेलमध्ये केलं बंद,असं काय घडलं?
भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून (2 जुलै 2025) बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यामुळे या सामन्यात तरी उट्टं काढून विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर इंग्लंड संघही मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, सामना सुरू होण्याआधीच बर्मिंगहॅममध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांचीही चिंता वाढली.

टीम इंडियाला हॉटेलमध्येच ठेवण्यात आलं
कर्णधार शुबमन गिल आणि काही खेळाडू मंगळवारी सराव सत्रात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अचानक हॉटेलमध्ये परत जाण्याचे आदेश देण्यात आले. कोणालाही हॉटेलबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
मंगळवारी दुपारी (स्थानिक वेळेनुसार) बर्मिंगहॅमच्या सेंटेनरी स्क्वेअर भागात एक संशयास्पद पॅकेट सापडल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. खेळाडूंना तातडीने सराव थांबवून हॉटेलमध्ये परत पाठवण्यात आलं.
त्या दिवशी कर्णधार शुबमन गिलसह 8 खेळाडूंनी पर्यायी सराव सत्रात भाग घेतला होता. पण परिस्थिती लक्षात घेता त्यांना लगेच परत बोलावण्यात आलं.
पोलिसांची अधिकृत माहिती
बर्मिंगहॅम सिटी सेंटर पोलिसांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली. माहितीनुसार,
"आम्ही सेंटेनरी स्क्वेअरभोवती नाकाबंदी केली असून, संशयित पॅकेजची चौकशी करत आहोत. दुपारी 3 च्या सुमारास ही माहिती मिळाली. खबरदारी म्हणून काही इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कृपया या भागात येऊ नका."
यानंतर बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला माहिती दिली की, पोलिसांच्या सूचनेनुसार भारतीय खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही वेळातच पोलिसांनी चौकशी पूर्ण करून सुरक्षा घेरा हटवला.
दुसऱ्या कसोटीसाठी कोणताही धोका नाही
सध्या परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून, भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला कोणताही धोका नाही. खबरदारी म्हणून फक्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीत भारताचा 5 विकेट्सनी पराभव झाला होता. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर भारत हरला, तर मालिकेत पिछाडीवर जाईल, म्हणून विजयासाठी संघाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.












Click it and Unblock the Notifications