मोठी बातमी : भारताला 15 वर्षांनंतर कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद; 3030 मध्ये अहमदाबादमध्ये आयोजन!
India to Host 2030 Commonwealth Games in Ahmedabad : भारताला 15 वर्षांनंतर 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सचे (Commonwealth Games - CWG) यजमानपद मिळाले आहे.
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यामध्ये, अहमदाबाद शहराला यजमान शहर म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले.
यापूर्वी भारताने 2010 मध्ये नवी दिल्लीत या खेळांचे यशस्वी आयोजन केले होते, तेव्हा भारतीय खेळाडूंनी 38 सुवर्ण पदकांसह एकूण 101 पदके जिंकून इतिहास रचला होता. 2036 ऑलिम्पिकच्या यजमानपदाची भारताची दावेदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने हे आयोजन अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

देशाबाहेरील पहिल्यांदाच मोठा आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा!
२०३० मधील कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद अहमदाबादला मिळाल्यामुळे एक महत्त्वपूर्ण इतिहास घडणार आहे. हे पहिल्यांदाच घडेल, जेव्हा कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट भारताच्या राजधानी दिल्लीबाहेर आयोजित केला जाईल.
यापूर्वी भारताने २०१० चे कॉमनवेल्थ गेम्स, तसेच १९५१ आणि १९८२ चे एशियन गेम्स यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे, पण त्या तिन्ही स्पर्धा केवळ दिल्लीत झाल्या होत्या. यामुळे अहमदाबाद आणि गुजरातला जागतिक क्रीडा नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.
अहमदाबादची निवड आणि तयारी!
कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाचे यजमानपद कोणत्या देशाला किंवा शहराला मिळेल, हे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्ड ठरवते. कॉमनवेल्थ संघाने अहमदाबादच्या पायाभूत सुविधा आणि तयारीची पाहणी करण्यासाठी दोनदा गुजरातचा दौरा केला होता.
बोलीची प्रक्रिया काय असते?
७ जून २०२५ रोजी भारतीय शिष्टमंडळाने लंडनमध्ये सादरीकरण केले आणि त्यानंतर केंद्र सरकारने २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी बोली लावण्यास मंजुरी दिली. २९ ऑगस्ट २०२५ रोजी, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, हर्ष संघवी, पीटी उषा आणि इतर अधिकाऱ्यांनी लंडनमध्ये अधिकृत बोली सादर केली.
अहमदाबादची ओळख
बोलीमध्ये अहमदाबादला एक आधुनिक, कॉम्पॅक्ट आणि उच्च-मानक क्रीडा शहर म्हणून सादर करण्यात आले. खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही देण्यात आली.
प्रस्तावित मुख्य ठिकाणे
यजमानपदासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम, नारणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह ही मुख्य ठिकाणे म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत.
CWG यजमानपदाचे महत्त्व आणि भविष्यकालीन दावेदारी!
कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन हे केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ते देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा, विकास क्षमता, पायाभूत सुविधा आणि दूरदृष्टीचे प्रतीक असते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक (५ वेळा) यजमानपद भूषवले आहे.
ऑलिम्पिक 2036ची दावेदारी मजबूत
कॉमनवेल्थ गेम्स २०३० चे यजमानपद मिळणे, हे ऑलिम्पिक गेम्स 2036 च्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारत 2036च्या ऑलिम्पिक गेम्सच्या यजमानपदाची तयारी करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने ऑलिम्पिक गेम्स-2036 चे यजमानपद मिळवण्यासाठी अधिकृतपणे दावेदारी सादर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली होती. CWG 2030च्या यशस्वी आयोजनामुळे भारताच्या क्षमता सिद्ध होऊन ऑलिम्पिक यजमानपद मिळण्याची शक्यता वाढेल.












Click it and Unblock the Notifications