IND vs NZ :काहीतरी नवं सांगा, तो खोटं बोलतोय!; सँटनरच्या 'कमिन्स' स्टाईल धमकीला सूर्याचं प्रत्युत्तर
IND vs NZ T20 World Cup 2026 Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या महाअंतिम सामन्यापूर्वी मैदानाबाहेरील वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याचे विधान करून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या खास 'देसी' शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सँटनरची 'माइंड गेम' आणि 2023च्या जखमा!
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने माध्यमांशी बोलताना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलची आठवण करून देणारी युक्ती वापरली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याचे वक्तव्य केले होते आणि दुर्दैवाने भारत तो सामना हरला होता.
सँटनर म्हणाला, "आमचे मुख्य ध्येय स्टेडियममधील 1.25 लाख भारतीय प्रेक्षकांना शांत करणे हेच आहे. भारत जेतेपदाचा रक्षक आहे आणि त्यांच्यावर घरच्या मैदानावर खेळण्याचा प्रचंड दबाव असेल. आम्ही या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहोत." सँटनरच्या या विधानाने भारतीय चाहत्यांच्या भावना भडकवण्याचा आणि टीम इंडियावर दडपण आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते.
"काहीतरी नवीन सांगा!" - सूर्याचा पलटवार
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या निर्भय फलंदाजीसाठी ओळखला जातोच, पण मैदानाबाहेरही तो तितकाच 'कूल' आणि धाडसी आहे हे त्याने दाखवून दिले. सँटनरच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सूर्या हसून म्हणाला. "तो खोटे बोलत आहे! प्रत्येकजण एकाच मार्गाने (पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल ठेवून) चालला आहे. काहीतरी नवीन सांगा."
सूर्याने पुढे स्पष्ट केले की, भारतीय संघ अशा मानसिक खेळांनी आता डगमगणारा नाही. "आम्ही खेळपट्टीच्या मागणीनुसार आमचा खेळ करू. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही आधीच कोणताही स्कोअर ठरवत नाही. जर खेळपट्टी २५० धावांची असेल तर आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जर परिस्थिती वेगळी असेल, तर आम्ही त्यानुसार रणनीती बदलू," असे सूर्याने ठामपणे सांगितले.
बदलेली टीम इंडिया: निर्भय क्रिकेटचे दर्शन
गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाने खेळलेल्या 'निडर' क्रिकेटमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. जुन्या पराभवांच्या सावलीतून बाहेर पडून हा संघ आता आक्रमक दृष्टिकोन स्वीकारत आहे. सँटनरने जरी मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी सूर्याच्या उत्तराने हे स्पष्ट केले की भारतीय संघ आता केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे.
उद्या महामुकाबला!
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा १.२५ लाख प्रेक्षक 'इंडिया इंडिया'चा जयघोष करतील, तेव्हा सँटनरची रणनीती यशस्वी ठरते की सूर्याचे 'टोकले' उत्तर मैदानात धावांच्या रूपात उमटते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २०२३ ची पुनरावृत्ती टाळून विश्वचषक आपल्याकडेच राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.












Click it and Unblock the Notifications