IND vs AUS: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने; कोण जिंकणार
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उद्या दुबई इंटनॅशनल स्टेडिअमवर पहिला सेमिफायनलचा सामना होणार आहे. हा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होणार आहे की दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येतील. हा सामना रोमांचक होणार असून, करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. उद्या कोणता संघ जिंकेल? दोघांचीही ताकद आणि कमकुवत बाजू काय आहेत? हे आपण पाहू...

भारताच्या कमजोर बाजू कोणत्या?
भारताची बॅटिंग चांगली होत असली तरी, गोलंदाजीत मोहम्मद शमी भारतासाठी प्रभावी ठरलेला नाही. त्याने पहिल्या सामन्यांत बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. पण त्यानंतर तो पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरुद्ध निष्प्रभ राहिला. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद शमी फॉर्ममध्ये नसल्याने सेमीफायनलमध्ये भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
भारताचे प्लस पाँईंट कोणते?
भारताने त्यांचे गट फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताकडे जगातील सर्वात मजबूत फलंदाजी लाइनअप आहे. टीम इंडियाचे फलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत. शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले आणि विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. रोहित शर्मा देखील संघाला वेगवान सुरुवात देत आहे. श्रेयस अय्यर मधल्या फळीत सातत्याने धावा करत आहे. फलंदाजी हेच भारताचे प्रमुख अस्त्र आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कमजोर बाजू कोणत्या?
जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि पॅट कमिन्ससारखे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहेत. दुसरीकडे गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ३५१ धावा दिल्या. अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघानेही २७३ धावा चोपल्या. गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियाची कमकुवत बाजू असल्याचे दिसून आले आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्लस पाँईंट कोणते?
ऑस्ट्रेलियाकडे स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज आहेत. ते खेळाडू खेळाचा मार्ग कधीही बदलू शकतात. ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघांचा विचार केला तर, आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने जास्त वेळा भारताचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सध्या लयीत नसली तरी, त्यांचे गोलंदाज कोणत्याही क्षणी लयीत येऊ शकतात.
किती वाजता होईल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना मंगळवार, ४ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (DICS) येथे सुरू होईल. नाणेफेक २ वाजता होईल.
लाईव्ह टेलीकास्ट- स्ट्रीमिंग कुठे होईल?
चाहते स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ वाहिन्यांद्वारे टीव्हीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर होईल.












Click it and Unblock the Notifications