क्रीडाविश्वात वादंग! शमीला का डावलले? हरभजनसिंगचा थेट अजित आगरकरवर निशाणा; 'या' शब्दात सुनावले!
Harbhajan slams ajit agarkar on Mohammed shami selection controversy : भारताचा अनुभवी आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला भारतीय संघात पुनरागमनासाठी 'वेट अँड वॉच' करावे लागत आहे. तंदुरुस्तीच्या कारणामुळे त्याला संघाबाहेर ठेवले जात असल्याचे बोलले जात असले तरी, हा मुद्दा खुद्द शमीनेच खोडून काढला आहे. 'आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत, तरीही आपल्याला डावलले जात आहे,' असा गंभीर आरोप शमीने निवड समितीवर केल्याने क्रीडाविश्वात मोठे वादळ उठले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भारताचा माजी आघाडीचा फिरकीपटू हरभजन सिंग यांनी निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

हरभजन सिंग यांचा आगरकरला थेट सवाल
ईसकाळ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमीला वारंवार डावलले जात असल्याबद्दल हरभजन सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'शमी कुठे आहे हे मला कळत नाही!' असा सवाल उपस्थित करत हरभजन सिंग म्हणाले की, "तुमच्याकडे प्रसिद्ध कृष्णा आहे, तो चांगला गोलंदाज आहे, पण त्याला अजून बरेच काही शिकायचे आहे. तुमच्याकडे चांगला गोलंदाज आहे आणि तुम्ही त्याला हळूहळू संघाबाहेर करत आहात."
बुमराहवर अवलंबून न राहण्याचा सल्ला
"जसप्रीत बुमराह असताना संघाची गोलंदाजी वेगळी आणि तो नसताना वेगळी, अशी स्थिती आहे. अशा वेळी शमी संघात असायला हवा होता. जसप्रीत बुमराहशिवाय जिंकण्याची कला आपल्याला शिकायला हवी," असे हरभजन सिंग यांनी स्पष्ट केले.
दर्जेदार कामगिरी असूनही डावलले?
हरभजन सिंग यांनी इंग्लंड दौऱ्याचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये बुमराह नसतानाही मोहम्मद सिराज आणि इतरांनी खूपच दर्जेदार कामगिरी केली आणि भारताने सर्व कसोटी सामने जिंकले. म्हणूनच बुमराहशिवाय भारतीय संघाची गोलंदाजी आणखी कसदार कशी होईल, याचा विचार करायला हवा.
फिरकीपटूंवरही प्रश्न
छोट्या फॉर्मेटमध्ये आपल्याला असे लोक शोधण्याची गरज आहे, जे सामना जिंकून देऊ शकतील. मग ते वेगवान गोलंदाज असो वा फिरकी गोलंदाज. "कुलदीप आहे, पण बाकीच्यांचं काय?" असा सवाल हरभजन सिंग यांनी केला आहे.
शमी vs आगरकर: फिटनेसचा वाद
मोहम्मद शमीला डावलण्यात आल्यावर त्याने टीका केली होती. यावर प्रत्युत्तर म्हणून, निवड समिती प्रमुख अजित आगरकर म्हणाले होते की, शमी पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याने आधी अधिकृत सामने खेळावे, अशी समितीची इच्छा आहे.
यावर मोहम्मद शमीने आपण 'पूर्णपणे तंदुरुस्त' असल्याचे जाहीर केले होते, तरीही त्याचा संघात समावेश झालेला नाही, ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे. शमीने रणजी करंडक सामने खेळून आपण किती फिट आहोत, हे दाखवून दिले आहे.
सुमार कामगिरीमुळे शमीची आठवण
एकीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ गोलंदाजीत सुमार कामगिरी करत आहे. ३५७ धावांचा मोठा डोंगर उभारल्यानंतरही भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत मोहम्मद शमीसारखा अनुभवी आणि तडफदार गोलंदाज संघात असायला हवा, असे अनेकांचे मत बनले आहे.
प्रसिद्ध कृष्णासारखा खेळाडू तंदुरुस्त असला तरी, महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी त्याच्यात अनुभवाची कमतरता दिसून येते. अशा वेळी अनुभवी मोहम्मद शमीचा संघात समावेश करायला हवा, अशी क्रीडा रसिकांची तीव्र अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications